अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- विकास कामाच्या माध्यमातून श्रीगोंदा शहराच्या चेहरा बदलण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. मात्र, प्रत्यक्षात कोट्यवधी रुपये खर्च होऊनही दर्जेदार काम होताना दिसून येत नाही आहे.
यामुळे ठेकेदार हे काम गुणवत्तापूर्ण करणार की नाही, असा प्रश्न या भागातील नागरिक उपस्थित करत आहेत. श्रीगोंदा शहरात यापूर्वी झालेले १७ रस्ते, तेथील दुभाजक,
तसेच लाईटचे काम यांच्या गुणवत्तेचा प्रश्न असताना आणि याप्रकरणी नागरिकांनी आंदोलन केलेले असताना आता नव्याने होत असलेल्या कामांच्या बाबतीत नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत ठेकेदार काम पुढे रेटत असल्याचे चित्र आहे.
शहरातील रविवार पेठ ते शनी चौक रस्ता काँक्रिटीकरणाची सुरुवात ठेकेदाराने केली. मात्र, अगोदरच या रस्त्याचे दोन तीन वेळा काम केल्यामुळे रस्त्याची उंची वाढत गेली अन् जुनी घरे आणि रस्ता बरोबर आला आहे.
आता नव्याने काम सुरू केले असताना रस्ता खडीकरण आणि मुरुमीकरणासाठी खोदला. मात्र त्यात अनेक ठिकाणी गटार नसल्याने आणि रस्त्यावर सारख्या प्रमाणात खडीकरण करताना ठेकेदार लक्षपूर्वक करत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
पालिकेकडे पूर्णवेळ लक्ष द्यायला अभियंता नाही. मग काम कसे होणार ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. याप्रश्नी भाजपच्या नगरसेविका वनिता क्षीरसागर यांनी या रस्त्याबाबत आता प्रशासनाला पत्र देत कामातील त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.