अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:- श्रीरामपूर शहराजवळील अरविंद डावखर यांच्या मळ्यात काल पहाटे चार चोरांनी चोरी करून एका महिलेला मारहाण केल्याची घटना घडली. यात रोख रकमेसह महिलेच्या गळ्यातील गंठण चोरट्यांनी चोरून नेले.
याघटनेबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील प्रभाग क्रमांक सातमधील अरविंद डावखर यांच्या मळ्यात एका घरात काल पहाटेच्या सुमारास चार अज्ञाच चोरट्यांनी मारहाण करुन जबरी चोरी केली.
लोखंडी रॉड, धारदार चाकु, लाकडी दांड्याने मारहाण केल्याने एक महिला जखमी झाली आहे. या भागात मंजित सुनार यांचे घर असून त्यांना भेटण्यासाठी लोकबहादुर प्रजित सुनार, कुणंती लोकबहादुर सुनार (रा. जयराम कॉलनी, पाचोरा, जि. जळगाव) काल शहरात आले होते.
रात्री जेवण झाल्यानंतर मंजित कामासाठी घराबाहेर पडला आणि लोकबहादुर आपल्या पत्नीसमवेत घरी झोपलेले होते. पहाटे तीन वाजेच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी मंजित यांच्या घराचा दरवाजा लाथा मारुन हत्याराने तोडून घरात प्रवेश केला.
आवाज आल्यानंतर लोकबहादुर जागे झाले; परंतू चोरट्यांनी त्याला मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच डोक्यात रॉड मारुन हातावर चाकुने वार केले. त्यात त्या जखमी झाल्या.
चोरट्यांनी लोकबहादुर यांच्या पाकिटातील ११ हजार रुपये आणि पत्नीच्या गळ्यातील नऊ हजार रुपयांचे सोन्याचे गंठण घेवून धुम ठोकली.
जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत्या चोरी, लुटमारी, दरोडा आदी घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.