अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत बाप लेकास बेदम मारहाण करत घरातील दागिने व रोख रक्कम असा ४ लाखांचा मुद्देमाल घेवून पसार झाले आहेत.
याबाबत सविस्तर असे की, गावातील राम मंदिरासमोरील दिलीप रामराव झंज यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करून आतील २ खोल्यांना बाहेरून कडी लावून झोपेत असलेल्या दिलीप झंज यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने ते बेशुद्ध पडले.
नंतर त्यांचा मुलगा प्रकाश दिलीप झंज व सून झोपलेल्या रुममध्ये चोरट्यांनी प्रवेश करुन कपाटातील ६ तोळे सोने व ५० ते ६० हजारांची रोख रक्कम चोरली. मात्र ही बाब मुलाच्या लक्षात आल्याने त्याने एका चोरट्यास त्याने धरले मात्र इतरांनी त्याला बेदम मारहाण करून मुद्देमाल घेवून पसार झाले.
या घटनेनंतर गावात अजूनही ४ ते ५ ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला होता. परंतु तो अयशस्वी ठरला. या घटनेतील जखमी बाप लेकास जबर मार लागल्याने नगर येथे एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
दरम्यान पोलीस उपअधीक्षक मुंढे म्हणाले की, हातगावात जो प्रकार घडला आहे. तो वाईट असून यातील चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या जातील. कारण चोरटे डॉ.निलेश मंत्री यांचे घरासमोरून जातानाचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत.