सुजित झावरे यांना कोविड सेंटरमधील महायज्ञ भोवणार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-टाकळी ढोकेश्वर गावात माजी आमदार दिवंगत वसंतराव झावरे कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. भाजप नेते सुजित झावरे यांनी याच कोविड केअर सेंटर मध्येच विश्वशांती यज्ञ आयोजित केला होता.

या वैज्ञानिक प्रकारा विरोधात आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाले असून तक्रार दाखल झाली आहे. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी त्यांचे वडील माजी आमदार वसंतराव झावरे यांच्या नावाने हे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.

तेथे २० मे रोजी विश्वशांती महायज्ञ करण्यात आला आला. यासंबंधी अंनिसच्या राज्य सचिव. रंजना पगार- गवांदे, सल्लागार बाबा अरगडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद भारुळे, काशिनाथ गुंजाळ, अॅड. प्राची गवांदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, करोनामुक्तीसाठी महायज्ञ करण्यात आल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. गेली वर्षभर आपण करोना विरोधात लढा देत आहेत. डॉक्टर व वैद्यकीय टीमच्या अथक प्रयत्नातून लाखो लोक करोनामुक्त झाले आहेत.

अशा परिस्थितीत करोना मुक्तीसाठी महायज्ञ करणे म्हणजे त्या सर्वांचेच श्रेय नाकारणे, त्यांच्या प्रती अविश्वास व्यक्त करणारे आहे. कोविड सेंटरमधे महायज्ञ करून तेथील हवा दुषित करणे, कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण वाढवून करोना रुग्णांच्या जीवनास धोका पोहचविणारी ही कृती आहे.

लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवून त्यांना चुकीच्या दिशेने नेणे आहे. त्यामुळे या महामारीच्या काळात लोकांच्या जीवनाशी खेळून अवैज्ञानिक मार्गाचा अवलंब करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.

अशा प्रकारच्या अशास्त्रीय व अवैज्ञानिक गोष्टी यापुढे जिल्ह्यात घडणार नाही याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24