अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नेहरु युवा केंद्र संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाच्या वतीने श्री गणेशाचे आगमन शेताच्या बांधावर वृक्षरोपण करुन करण्यात आले.
पर्यावरणपुरक श्री गणरायाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तर गणेशोत्सव काळात विविध सामाजिक उपक्रम घेऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे. डोंगरेवस्ती येथे आंब्याचे झाड लाऊन श्री गणेशाची स्थापना शासनाचा आदर्श युवती पुरस्कार प्राप्त प्रियंका डोंगरे-ठाणगे यांच्या हस्ते झाली.
यावेळी यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, सचिव मंदाताई डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, वैभव पवार, रितेश डोंगरे, कृष्णा डोंगरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. संस्थेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त महिला व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मतदार जागृती, व्यसनमुक्तीवर कार्यक्रम घेऊन, ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात येणार असल्याचे पै. नाना डोंगरे यांनी सांगितले. गणपती प्रतिष्ठापनेच्या पहिल्या दिवशी संस्थेच्या वतीने पर्यावरण संवर्धन, प्रदुषण मुक्ती व स्त्री जन्माचे स्वागत या विषयावर घरगुती देखावा स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे.
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्या स्पर्धकांनी घरात साकारलेल्या देखाव्यासह एक सेल्फी व एक फक्त देखाव्याचे असे दोन छायाचित्र 9226735346 या नंबरवर व्हॉट्सअप करायचे आहे.
फोटो पाठवताना स्पर्धकांनी नांव व पत्ता टाकणे आवश्यक असून, या स्पर्धेसाठी दि.17 सप्टेंबर पर्यंत स्पर्धकांना देखाव्याचे छायाचित्र पाठविता येणार आहे. पहिल्या तीन क्रमांकाच्या स्पर्धकांना संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.