अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- हाराष्ट्र लोकसेवा आयोगाव्दारे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ही नगरच्या केंद्रावर शनिवारी सुरळीत पार पडली. या परीक्षेला सहा हजार उमेदवारांनी दांडी मारली.
कोणताही गोंधळ न होता शांततेत परीक्षा झाली. विशेष म्हणजे उमेदवारांना प्रश्नपत्रिका सोबत हॅण्डग्लोज, सॉनिटायझर व मास्क असलेले एक किट देण्यात आले होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ साठी शनिवारी संयुक्त परीक्षा झाली. राज्य कर निरीक्षक (एसटीआय), पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) आणि एएसओ (असिस्टंट सेक्शन ऑफिसर, मंत्रालय) या तीन पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली.
या परीक्षेसाठी 60 उपकेंद्र निश्चित करण्यात आले होते. परीक्षेसाठी शुक्रवारपासून जिल्हा प्रशासनाची लगबग सुरू होती. शनिवारी सकाळी 11 ते 12 या वेळत ही परीक्षा पार पडली.
परीक्षेसाठी जिल्हाभरातून 19 हजार 147 उमेदवारांनी नोंदणी केलेली होती. प्रत्यक्षात परीक्षेला 12 हजार 549 उमेदवार हजर होते. यावेळी करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
परीक्षेला तब्बल 6 हजार 598 उमेदवारांनी दांडी मारली. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. परीक्षा सुरळीत आणि कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत पार पडली, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा परीक्षेचे केंद्र प्रमुख संदीप निचित यांनी सांगितले.
दरम्यान परीक्षेला प्रवेश करताना उमदेवारांच्या हातात एक किट देण्यात आले होते. त्यामध्ये सॉनिटायझरची पाऊच, हॅण्ड ग्लोज, एक मास्क देण्यात आला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यावेळी विशेष दक्षता घेण्यात आली होती.