अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- मागील चार दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात ठिकठिकाणी मोठे आर्थिक नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बीड जिल्ह्यात मोठी जीवितहानी झाली आहे. बीड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये सहा जणांचा बुडून, वाहून गेल्याने मृत्यू झाला.
तसेच 16 जनावरांसह 900 कोंबड्या दगावल्या आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार केला आहे. यातच अनेक ठिकाणी नद्या , नाले दुथडी भरून वाहू लागले आहे. यातच बीड जिल्ह्यात देखील पावसाचा मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी तलाव फुटण्याच्या भीतीने अख्ख गाव रात्रभर जागलं, SDRF घटनास्थळी गेवराई तालुक्यात पाच साठवण तलाव फुटले आहेत.
धारूरमधील आरणवाडी तलावाचा सांडवा दुसऱ्यांदा फोडावा लागला. नद्या, नाल्यांसह ओढे खळखळून वाहून गेले. अनेक गावांत पाणी शिरले. हजारो हेक्टर जमीन आणि पिके पाण्याखाली गेल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
प्रशासनाने पाऊस कमी झाल्यानंतर पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका हा शेतीला बसलेला आहे. गतवर्षी खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी यंदा अधिकच्या दराने बियाणांची खरेदी केली. हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ दिली.
त्यामुळे दुबार पेरणीचेही संकट शेतकऱ्यांवर ओढावले होते. परंतु, उत्पादनाच्या दृष्टीने खरिपात सोयाबीन, उडीद, मूग ची लागवड केली. पिक जोमात असतानाच राज्यात पावसाने हाहाकार केला खरिपाच्या पिकासह फळबागांचेही नुकसान झाले आहे.