अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येनें कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे.
दरदिवशी वाढती आकडेवारी प्रशासनासह नागरिकांसाठी धडकी भरवणारी आहे. यामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहे.
यातच वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिक आता लसीकरणासाठी गर्दी करू लागले आहे. केंद्र सरकार लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सल्ला देत आहे,
पण लस पुरवठा करताना हात आखडता घेत आहे की काय अशी परिस्थिती सध्या पहायला मिळत आहे.
नगरमध्ये मनपाच्या केंद्रांवर सध्या करोना लसीकरणाची व्यवस्था सुरु आहे. परंतु, याठिकाणी तासाभरातच लस उपलब्ध नसल्याने लसीकरण होणार नाही, असे बोर्ड लावण्यात येत आहे.
आजही (दि.7 एप्रिल) सावेडीतील एका लसीकरण केंद्रावर सकाळी 10.30 वाजताच लस उपलब्ध नसल्याने लसीकरण होणार नाही असा बोर्ड लावण्यात आला.
त्यामुळे उन्हातान्हात लस घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा परतावे लागले. सरकार एकीकडे करोना लसीकरणासाठी आवाहन करीत आहे,
त्याचवेळी लसीकरणासाठी तयार असलेल्या नागरिकांना असे हेलपाटे मारावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.