अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- डिसेंबर अखेर पर्यंत राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच कमी झालेला दिसून आला होता. यामुळे नागरिकांसह प्रशासन देखील निर्धास्त झाले होते. यामुळे जिल्ह्यातील कोविड सेंटर देखील बंद करण्यात आले होते.
मात्र जानेवारी – फेब्रुवारी दरम्यान कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा भरघोस वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकतेच वाढत्या कोरोनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. दरम्यान जिल्ह्यात नवीन करोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे प्रशासनाने कोविड सेंटर सुरू केले आहेत.
बुधवारी जिल्ह्यात नव्याने 215 रूग्णांना करोना संसर्गाचे निदान झाले. तर उपचारानंतर 176 रूग्णांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या 1 हजार 288 रूग्णांवर उपचार सुरू आहे.
बुधवारी करोनामुळे एकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात 1 हजार 148 रूग्णांचा मृत झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 46, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 152 आणि अँटीजेन चाचणीत 17 रुग्ण बाधीत आढळले.