अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तकांचा संप सुरु असताना महापालिकेतील आशा कर्मचारी यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे मानधन व दररोज तीनशे रुपये प्रमाणे भत्ता मिळावा, कायमस्वरूपी नियुक्तीपत्र देण्यासह विविध मागण्यांसाठी महापालिका कार्यालया समोर निदर्शने करुन संपाचा इशारा दिला.
आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा, गटप्रवर्तक संघटना व अहमदनगर जिल्हा आशा संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात जनरल सेक्रेटरी अॅड.कॉ. सुधीर टोकेकर, कार्याध्यक्षा सुर्वणा थोरात, कॉ. भारती न्यालपेल्ली, स्वाती भणगे आदींसह महापालिकेच्या आशा कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.
महापालिकेत चाळीस आशा कर्मचारी कार्यरत असून, गेल्या दहा वर्षापासून कार्य करत आहे. त्यांना अकरा महिन्याच्या कंत्राटी पध्दतीने नेमणुक केली जात आहे. विविध मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने महापालिकेला 2019 व 2020 मध्ये देखील निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आला होता.
मात्र त्यांचे प्रश्न अद्यापि सोडविण्यात आलेले नाही. कोरोना काळात मागील वर्षी त्यांना महिन्याला एक हजार रुपयाची मोजकी रक्कम दिली जात होती. ती सध्या बंद करण्यात आली आहे. एप्रिल 2021 पासून आशांना महिन्याला एक हजार प्रोत्साहन भत्ता देण्यात येत असून, दिवसाला त्यांना 31 रुपये दिले जात आहे.
केवळ मोजकीच रक्कम कोरोना काळ एप्रिल 2020 पूर्वी देत होते व ती रक्कम रुपये 1 हजार च्या आसपास होती एप्रिल 2019 पासून रुपये 1000 पुढचे प्रोत्साहन भत्ता देत आहेत म्हणजेच त्यांना दररोज रुपये 33 रुपये रोज देऊन त्यांनी थट्टा करण्यात आली आहे.
या महागाईच्या काळात देण्यात आलेल्या तोकड्या रकमेत त्यांना कुटुंबाची जबाबदारी सांभाळून इतर खर्च भागवायचा आहे. आशांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. आशांची कंत्राटी पद्धतची नेमणुक रद्द करून त्यांना कायमस्वरूपी नियुक्तीपत्र देण्यात यावे, कोरोना काळात काम केलेल्या इतर जिल्ह्यातील आशांना तीनशे रुपये रोज देण्यात आले असून,
अहमदनगर महापालिकेने देखील आशांना दररोज तीनशे रुपये भत्ता द्यावा, कोरोनाने बाधित झालेल्या आशा, गटप्रवर्तकांची सुट्टी झाल्याने पगार देण्यात आले नसून, त्यांना तातडीने त्यांचे पगार अदा करावे, आरोग्य खात्याच्या नोकर भरतीत आशा गटप्रवर्तक यांना प्राधान्य द्यावे,
आरोग्य कंत्राटी कर्मचार्यांप्रमाणेच गटप्रवर्तक यांचे सुसूत्रीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन आयुक्त शंकर गोरे व स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांना देऊन चर्चा करण्यात आली. सदर प्रश्न न सोडविल्यास महापालिकेतील आशा कर्मचारी संपावर जाणार आहेत.