विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीकडून आशा सेविकेला मारहाण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यातच नागरिकांनी स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी. तसेच शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

मात्र तरीही नागरिक बेजाबदारपणा दाखवतच आहे. यातच मास्क लावायला सांगितल्याचा रागातून एका व्यक्तीने आशा सेविकेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दरम्यान हि धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील बोरबन गावात घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, घारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशासेविका कुसुम दत्तात्रय गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोरबन गावात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अंतर्गत आरोग्य सर्वेक्षण सुरू होते. ग्रामसेवकांच्या आदेशाने आशासेविका कुसुम गाडेकर या सर्वेक्षणात काम करत असताना त्यांनी भारत गाडेकर याच्या पत्नीला मास्क लावा, असे सांगितले होते.

याचा राग आल्याने त्याने आशासेविका गाडेकर व त्यांचे पती दत्तात्रय गाडेकर यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

भारत अशोक गाडेकर (रा. बोरबन, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस हेडकॉन्स्टेबल आर. व्ही. खेडकर अधिक तपास करीत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24