अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :-  मागील अडीच महिन्यांपुर्वी राशीन येथील पोलीस दुरक्षेत्रावर कार्यरत असलेले होमगार्ड बापू गदादे यांचा चौदा वर्षाचा मुलगा शुभम झाडावरून जमिनीवर पडला होता. त्यात त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती.

त्याला तातडीने उपचार मिळावेत म्हणुन विनाविलंब कर्जतच्या पोलीस निरीक्षकांनी पुणे येथील तज्ञ डॉक्टरांकडे आपल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या मदतीने उपचारासाठी पाठवले होते.त्यात त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याचे निदान झाले.

पोलीस निरीक्षक यादव यांनी सह्याद्री हॉस्पिटलमधल्या डॉ. विनायक देंडगे या डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य उपचार मिळवून दिले.या शस्त्रक्रियेसाठी जरासा उशीर झाला असता तर शुभमला कायमचे अपंगत्व आले असते असे डॉक्टरांनी सांगितले होते.

त्यानंतर पोलीस निरीक्षक हे त्या डॉक्टरांच्या संपर्कात राहिले.डिस्चार्ज देताना यादव यांनी डॉक्टरांशी बोलून बिलाची रक्कम कमी करण्याची विनंती केली.कर्जतच्या पोलीस यंत्रणेचे समाजाभिमुख काम पाहून डॉक्टरांनीही बिलाची रक्कम कमी केली.

पोलीस निरीक्षक यादव यांची मदत आणि डॉक्टरांनी केलेल्या सहकार्यामुळे गदादे कुटुंबाला मोठा आधार मिळाला. मात्र हे ऋणानुबंध एवढ्यावरच थांबले नाही.

ज्या डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली होती त्या डॉक्टरांचा पोलीस निरीक्षक यादव यांना अडीच महिन्यानंतर फोनकॉल आला की, ‘मुलगी स्वानंदीचा पहिला वाढदिवस आहे आणि तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शुभमसह त्याच्या कुटुंबीयांना पाच वर्षांचे न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीचे विमा संरक्षण देत आहोत’.

या कॉलमुळे पोलिस निरीक्षक यादव यांचेही अंतःकरण भरून आले. त्यासाठी लागणारी रक्कम पुढील 5 वर्षे प्रत्येक वर्षी डॉक्टर भरणार आहेत. डॉ.विनायक देंडगे यांनी दाखवलेल्या या दातृत्वाचे कर्जतच्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आभार व्यक्त केले…