अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाच्या सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामासह पूर्वीच्या ठेकेदाराने केलेल्या कामाबाबत माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या आहते. एखाद्या कामाबाबत पत्रकारांनी एकत्र येऊन तक्रार करणं निश्चितच गांभीर्याची गोष्ट आहे. त्यामुळे या ठेकेदाराची मार्चनंतर उचलबांगडी करणार असून, हे काम मी माझ्या पद्धतीने आता पूर्ण करून घेणार आहे.
असा विश्वास खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिष्टमंडळाला दिला आहे. नगर पाथर्डी मार्गे जात असलेल्या कल्याण -निर्मळ- विशाखापटण्म या राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने आणि निकृष्ट पद्धतीने सुरू आहे. काम इस्टिमेट प्रमाणे होत नसून करंजी तिसगाव येथे मोठ्या प्रमाणात महामार्गावर खड्डे पडलेले आहेत, ते खड्डे बुजवण्यास देखील गेल्या वर्षभरापासून या ठेकेदाराला वेळ मिळालेला नाही.
त्यामुळे या दोन्ही गावचे व्यापारी व स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गेल्या चार वर्षापासून या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असुन मध्यंतरी पूर्वीच्या ठेकेदाराकडून काम व्यवस्थित व चांगल्या दर्जाचेे होत नसल्या कारणाने पूर्वीच्या ठेकेदाराचे काम रद्द करून नवीन ठेकेदार नेमण्यात आला त्यानंतर या महामार्गाचे काम उरकते घेण्याचे काम या ठेकेदाराने केले.
अनेक ठिकाणचे धोकादायक वळण दुरूस्त न करता जैसे थेच ठेवण्याचे काम ठेकेदाराकडून सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण न करताच थेट डांबरीकरण करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. नव्याने करण्यात आलेले पुलही अरुंद आहे त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. तसेच महामार्गावर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे तसेच ठेवून ठराविक ठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम केले आहे.
महामार्गाचे काम उरकते घेण्याच्या प्रयत्नात ते इस्टिमेट प्रमाणे होताना दिसत नाही याची गंभीर दखल खासदार विखें यांनी घ्यावी अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने केली होती. या महामार्गाबाबत आठ दिवसापुर्वी जिल्हाधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले होते.