अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढू लागला आहे. यामुळे शहर तसेच गाव परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकतेच एक धक्कादायक घटना चांदबीबी परिसरात घडली आहे.(leopard news)
नगर मधील चांदबीबी परिसरात नवा धूमकेतू पाहण्यासाठी जाणार्या खगोलप्रेमींना अचानक बिबट्या आडवा गेल्याने त्यांची तारांबळ उडाली. या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे यापूर्वीही अनेकदा समोर आले आहे.
दरम्यान या परिसरात अनेकजण फिरण्यासाठी येत असतात. यामुळे नागरिकांनी देखील या परिसरात जाताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, व्हर्सटाईलग्रुप या खगोलप्रेमी ग्रुपने चांदबीबी महाल याठिकाणी आकाश दर्शन कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
रात्रीच्या आकाशात नुकताच दिसू लागलेला सी -2021 ए 1 लिओनार्डो नावाचा धूमकेतू प्रदीर्घ लंब वर्तुळाकार प्रवास करीत आहे.
हेच निमित्तसाधून व्हर्साटाईल ग्रुपने अत्याधुनिक टेलिस्कोपच्या माध्यमातून खगोलप्रेमींसाठी आकाशदर्शन हा कार्यक्रम आयोजित केला होता .
या कार्यक्रमाकरिता व्हर्सटाईल ग्रुपचे सदस्य चारचाकी वाहनाने चांदबीबी महालाकडे जात असताना अचानक बिबट्या त्यांचा समोरून शांतपणे गेला.
बिबट्याने मागे वळून पाहिले आणि लगेचच झुडुपामध्ये निघून गेला. या घटनेने क्षणभर स्तब्ध झालेले दोघेही नंतर महालाकडे निघून गेले. चारचाकी वाहनात असल्याने ते सुरक्षित होते. यापूर्वी या भागात बिबट्या दिसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.