अर्बनच्या ठेवीदारांचा आसूड मोर्चा ! संतप्त आंदोलकांचा आक्रोश, सुवेंद्र गांधींसह पोलीस अधिकाऱ्यांनी दिला ‘हा’ शब्द

Published by
Ahmednagarlive24 Office

नगर अर्बन बँकेचे लायसन्स रिझर्व्ह बँकेने रद्द केले. त्यामुळे अनेकांचे पैसे बँकेत गुंतून पडले. तसेच ५ लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्यांना आपले पैसे मिळतील याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ठेवीदारांनी बँक बचाव समितीच्या नेतृत्वाखाली काल बुधवारी भाजपचे माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांच्या घरावर व पोलिस अधीक्षक कार्यालयावर आसूड मोर्चा काढत आंदोलन केले.

यावेळी संतप्त झालेल्या आंदोलकांनी चिल्लर घोटाळा, बनावट सोने तारण घोटाळा, सस्पेन्स अकाउंट घोटाळा, बोगस कर्ज वाटप आदी घोटाळ्यांमुळे बँक अडचणीत आली असून आता ठेवीदारांना हक्काचे पैसे मिळत नसल्याचा आरोप यावेळी ठेवीदारांनी केला.

आसूड उगारून ठेवीदारांनी जोरदार घोषणाबाजी यावेळी केली. अर्बन बँक घोटाळ्याप्रकरणी जे दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हायला हवी, ठेवीदारांच्या तक्रारी घेऊन ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

काय म्हणाले पोलीस अधिकारी

अपर अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अनिल कातकाडे, कमलाकर जाधव यांनी यावेळी आंदोलकांशी चर्चा केली. अपर अधीक्षक खैरे यांनी फॉरेन्सिक ऑडिट करणाऱ्या संस्थेशी यावेळी त्वरित संपर्क साधला. उद्या (गुरुवारी) ऑडिट रिपोर्ट दिला जाईल, असे यावेळी त्याची शिष्टमंडळास सांगितले.

संतप्त ठेवीदारांनी सुवेंद्र गांधींना घेरले, सुवेंद्र गांधींनी प्रयत्न करू असे संगितले

आसूड मोर्चा जेव्हा माजी खा. स्व. दिलीप गांधी यांच्या बंगल्यासमोर आला तेव्हा मोठी घोषणाबाजी झाली. आमच्या ठेवी व खात्यात अडकलेले पैसे पाहिजेत, आम्ही दोन वर्षे तुमचे ऐकले. आता आम्ही किती दिवस थांबायचे, असा सवाल यावेळी आंदोलकांनी केला. यावेळी या आंदोलकांना माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी सामोरे गेले.

ते म्हणाले की, ठेवीदारांना ठेवी परत मिळाव्यात व बँक पुन्हा सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. थकीत वसुलीसाठी आमचे प्रयत्न सुरू असतानाच रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केला, त्यामुळे अडचण झाली आहे. परंतु आम्ही प्रयत्न सुरु ठेवणार आहोत. सर्वांसाचे पैसे देण्यासाठी प्रयत्न करत आहोत अशी भूमिका गांधी यांनी मांडली. परंतु ठेवीदार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

पोऱ्हा-बाळांचे लग्न करायला, औषधोपचार करायला आता पैसे नाहीत

पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी आंदोलकांनी आपल्या व्यथा मांडल्या. ठेवीदार गोरगरीब , सर्वच लोक सर्वसामान्य आहेत. त्यांना पैसे मिळत नसल्याने त्यांना औषधोपचार, मुलामुलींच्या लग्नासाठी पैसे मिळत नाहीत, हक्काचे पैसे असून पोऱ्हा-बाळांचे लग्न करायला, औषधोपचार करायला आता पैसे नाहीत अशा व्यथा यावेळी मांडण्यात आल्या.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office