अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- अॅट्रोसिटीचा गुन्हा मागे घेण्यासाठी मागासवर्गीय समाजातील कुटुंबीयांना जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार कोथुळ (ता. श्रीगोंदा) येथे झाला असताना देखील या गुन्ह्यातील आरोपींना अटक होत नसल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने निषेध नोंदविण्यात आला.
तर या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची व पिडीत कुटुंबीयांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे कलम लावण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के,
कार्याध्यक्ष दानिश शेख, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नईम शेख, जमीर इनामदार, संतोष पाडळे, विकी प्रभळकर, सोनू भंडारी, पिडीत कुटुंबीय आत्माराम धस, पवार धस, कैलास धस, सविता धस, देवराज धस आदी उपस्थित होते.
कोथुळ (ता. श्रीगोंदा) येथे धस व लाटे परिवारात जागेच्या वादातून भांडण झाले. 23 जून रोजी सकाळी लाटे परिवाराने धस यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. सदर प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशनला करण्यासाठी जात असताना लाटे परिवारातील सदस्यांनी धस यांच्या अल्टो गाडीवर ट्रॅक्टर टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
धस कुटुंबीय मागासवर्गीय असल्याने त्यांच्यावर दहशत निर्माण करुन जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या अंगावर शेण टाकण्यात आले. तर महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन त्यांचे कपडे फाडण्यात आले. सदर प्रकरणात धनंजय लाटे, मनोहर लाटे, सुधाकर लाटे,
सुभाष लाटे, लक्ष्मण लाटे, मिराबाई लाटे, सोनाली लाटे (सर्व राहणार कोथुळ) यांच्यावर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (अॅट्रोसिटी अॅक्ट) कायद्यान्वये बेलवंडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र रात्री अकरा वाजेपर्यंत पीडित कुटुंबाला गुन्हा दाखल करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.
धस यांच्यावर दहशत करुन त्यांना धारदार शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आले. मात्र पोलिस प्रशासनाने त्या ठिकाणी शस्त्र न दाखवता दगडाने मारहाण केल्याचे दाखवले. अपंग व मतिमंद यांना मारहाण झाली असताना त्याचा वेगळा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
आरोपींना सहज जामीन कशी मिळेल या पध्दतीने पोलीसांनी कलम लावण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे. अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होऊन एक महिना उलटून देखील आरोपी गावात सर्रास फिरत असून, त्यांना अद्यापि अटक करण्यात आलेली नाही.
पिडीत कुटुंबीयांना धमकावून त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न लाटे परिवारातील आरोपी सदस्य करत आहे. लाटे कुटुंबातील एका महिलेने देखील पिडीत कुटुंबातील सदस्यांवर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. पिडीत कुटुंबीयांना शारीरिक व मानसिक त्रास देण्याचे काम आरोपींच्या कुटुंबातील सदस्य करीत आहे.
सर्व आरोपींना 2 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अॅट्रोसिटीचा गुन्हा मागे घेण्यासाठी धस कुटुंबातील काही सदस्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदर आरोपींपासून धस कुटुंबीयांच्या जिवीतास धोका निर्माण झाला असून,
या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पिडीत कुटुंबातील सदस्यांचा जीव गेल्यास याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.