अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- नेप्ती (ता. नगर) येथील शंकर कदम यांची वडिलोपार्जित जमीन काही गाव गुंड बळकाविण्याचा प्रयत्न करीत असून, सदरील मागासवर्गीय कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ करुन हिनतेची वागणुक मिळत असल्याने गावगुंडांवर अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, कार्याध्यक्ष दानिश शेख, युवक तालुका उपाध्यक्ष विशाल कदम, जावेद सय्यद, संतोष पाडळे, अजीम खान, दिनेश पाडळे, विकी प्रभळकर व कदम कुटुंबीय उपस्थित होते.
शंकर कदम यांची नेप्ती (ता. नगर) येथे वडिलोपार्जित साडे तीन एकर जमीन आहे. सदर जमीनी संदर्भात दिवाणी न्यायालयात वाद सुरु आहे. मात्र ही जमीन बळकाविण्यासाठी गावातील काही गावगुंडांनी कदम कुटुंबीयांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. त्यांना जातीवाचक शिवीगाळ करुन हिनतेची वागणुक दिली जात आहे.
जातीयवादी गुंड प्रवृत्तीच्या गावगुडांकडून त्यांची गळ्यात मडके अडकवून धिंड काढण्याची तयारी देखील असल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे. शंकर कदम यांच्या ताब्यात असलेल्या जमीनीच्या सातबारा उतार्यावर त्यांच्या आजोबांचे नांव आहे.
गावगुंडांनी खोटी खरेदीखत करुन सदर जमिन बळकाविण्यासाठी 3 सप्टेंबर रोजी जमिनीवर असलेले पत्र्याचे शेड जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले. कदम कुटुंबीय मागासवर्गीय असल्याने त्यांची पोलीस स्टेशनला व गावपातळीवर दखल घेण्यात आली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
जागेचा वाद न्यायप्रविष्ट असताना गावगुंडांकडून जातीयवादीवृत्तीतून मागासवर्गीय कुटुंबीयांना त्रास देण्याचा प्रकार सुरु असून, संबंधीतांवर त्वरीत अॅट्रोसिटी अॅक्टनुसार कारवाई करण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे. पिडीत कुटुंबीयांना न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालया समोर गळ्यात मडके व कंबरेला खराटा बांधून प्रशासनाचा निषेध करण्याचा इशारा देण्यात आला आहे.