अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- टाळेबंदीचा गैरफायदा घेऊन केडगाव येथील सार्वजनिक स्वच्छता गृह (मुतारी) जमीनदोस्त करुन सरकारी जागा बळकाविण्याचा प्रयत्न केला जात असताना महापालिकेने संबंधितांवर कारवाई करुन नागरिकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृह त्या जागेवर बांधण्याची मागणी महाराष्ट्र मुस्लिम महासंघाच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
केडगाव, अर्चना हॉटेल शेजारी 1985-86 साली सार्वजनिक स्वच्छता गृह (मुतारी) बांधण्यात आले होते. या जागेवर स्वच्छता गृह असल्याची सरकार दप्तरी नोंद आहे. मागील टाळेबंदीमध्ये स्वच्छता गृहाची स्वच्छता झाली नसल्याने अज्ञात व्यक्तीने मुद्दामहून तेथे काट्यांची झाडे टाकून व पत्रे ठोकून त्याचा वापर बंद करण्यास भाग पाडले.
यामुळे या परिसरात स्वच्छतागृह नसल्याने स्थानिक दुकानदार, रिक्षाचालक यांना विनाकारण त्रास झाला. या स्वच्छता गृहाची दुरुस्ती होण्यासाठी 7 मार्च रोजी नगरसेवक अमोल येवले यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती.
तरीदेखील अज्ञात व्यक्तींकडून सार्वजनिक स्वच्छता गृह (मुतारी) अवैध रित्या पाडण्यात आले. तर ही जागा बळकाविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.