अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातील वाघापूर शिवारात शेतजमिनीच्या वादातून शेतकर्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्याला चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, वाघापूर येथील भागवत शिंदे व ज्ञानदेव शिंदे त्यांच्या परिवारात गेल्या दीड वर्षापासून शेत जमिनीवरून वाद आहे. हा वाद तहसीलदारांच्या न्यायालयात सुरू आहे.
दरम्यान विजय शिंदे हा ट्रॅक्टर घेऊन आला. त्यावेळी त्याच्यासोबत अजित संपत शिंदे व राहुल संपत शिंदे हे होते. विजय शिंदे यांनी आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर शेतात घातला असता अनिल भागवत शिंदे (वय 37) याने विरोध केला.
यावेळी त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली ट्रॅक्टर चालक विजय शिंदे याने अनिल शिंदे यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. त्याला धक्का लागला तो बाजूच्या शेतात पडला. यामध्ये अनिल हा जखमी झाला. यानंतर तिघांनी त्याला शिवीगाळ करत मारहाण केली.
याबाबत अनिल भागवत शिंदे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अजित संपत शिंदे, राहुल संपत शिंदे व ज्ञानदेव रघुनाथ शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील एकाला अटक करण्यात आली असून त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.