Ahmednagar News : येथील शहरासह दहेगाव परिसरात काल रविवारी (दि.९) सायंकाळी झालेल्या जोरदार गारांच्या अवकाळी पावसाने दहेगाव मध्ये घरांच पडझड झाली आहे. तसेच द्राक्ष, कांदा, मका, आंबा, डाळिंब व गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोलमडले आहे.
मागील नुकसान भरपाई मिळणे बाकी असतानाच पुन्हा गारपिटीने शेतातील उभ्या पिकांचे नुकसान करून शेतकऱ्याला मोठा धक्का बसला आहे. आता तरी शासन जागा होऊन त्वरित मदत देईल कि नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
काल रविवारी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या गारपिटीच्या पावसाने शेतकऱ्यांसह व्यापारी नागरिक सर्वांची दणादाण उडून दिली. शेतातील सोंगणी योग्य पिके तसेच द्राक्ष बागा, कांद्याचे पीक गारपीटीत भुईसपाट झाले.
भावाच्या अपेक्षेने व्यापाऱ्यांशी सौदा राहिलेल्या द्राक्ष बागा गारपिटीने झोडपून निघाल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. होच अवस्था डाळिंब तसेच आंबा फळबाग शेतकऱ्यांची झाली असून मागास असलेला गहू काढण्यासाठी शेतात उभा होता.
त्यावर देखील सुलतानी संकटाने आक्रमण करून शेतकऱ्याला अडचणीत आणले आहे. शेडबाहेर असलेल्या जनावरांना गारांच्या पावसाचा मोठा फटका बसला. पिंपळस येथील कुदळे, निरगुडे वस्तीभागात शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले.
तर साकुरी येथे दोन घरांचे पत्रे उडाले असून भाऊ सातपुते यांच्या घराचे पत्रे उडाले आहे. पशुधनासाठी राखून ठेवलेला मका व इतर हिरवा चारा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. मका पिकाची पाने मोठ्या प्रमाणात पडली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. सुमारे अर्धा तास चाललेल्या या गारपिटीच्या जोरदार पावसाने शेतकऱ्याची पुरती धांदल उडाली.
मागील अतिवृष्टीत अनेकांची नुकसान भरपाई येणे बाकी असताना तसेच काही तांत्रिक कारणास्तव नुकसान होऊनही अनेकांना नुकसान भरपाई मिळण्यात अपात्रतेला सामोरे जावे लागले. त्यात आता नव्याने पुन्हा गारपिटीने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका दिला आहे.
काल रविवारी (दि.9) सायंकाळी सहा वाजेनंतर राहाता शहरासह शेजारील पिंपळसचा काही भाग, दहेगाव, साकुरी, नांदुखी, कोहाळे या भागात थैमान घातले. पिंपळस येथे कुदळे वस्तीभागात गारा आणि वादळी पावसाने द्राक्षाचे मोठे नुकसान झाले. गारांच्या तडाख्याने वेलीवरील द्राक्षांचे घड निखळून जमिनीवर पडले.
वेलीचे पानेही निखळून जमिनीवर पडली. शेजारील दहेगावात द्राक्ष तसेच डाळींबाच्या बागांचे नुकसान झाले. भगवान डांगे यांच्या डाळिंब बागांचे, शिवाजी डांगे, अशोक ठाकरे यांचे द्राक्षेबाग अक्षरश: मोठे नुकसान झाले. माऊली डांगे, शिवाजी मुरलीधर डांगे आदीच्या बागांचे मोठे नुकसान झाल्याचे दहेगावचे सरपंच भगवान डांगे यांनी सांगितले.
वादळी पावसाने काही ठिकाणी उभी झाडेही उन्मळुन पडली. ज्ञानेशवर डांगे यांच्या घरी महाराज आले होते. त्यांच्या गाडीवर झाड उन्मळुन पडल्याने या गाडीच्या काचा फुटल्या. दुचाकीचेही नुकसान झाले. उभ्या मकाही काही ठिकाणी जमिनदोस्त झाल्या.