अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-अवतार मेहेरबाबा ट्रस्ट कामगारांचे वेतन वाढीचे प्रकरण सहाय्यक कामगार आयुक्तांपुढे सुरु असून, 23 फेब्रुवारी रोजी शेवटची सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवजयंती दिनी लाल बावटा संलग्न अवतार महेरबाबा कर्मचारी युनियनची अरणागाव (ता. नगर) येथे बैठक पार पडली.
वाढती महागाई, कोरोना महामारीमुळे ओढवलेले आर्थिक संकटामुळे कामगारांचे अत्यल्प पगार असल्याने दरमहा चार हजार पाचशे तर पुढील दोन वर्षासाठी दरमहा पाच हजार पाचशे रुपये पगारवाढ देण्याची मागणी केली आहे.
शेवटच्या तारखेत पगारवाढीवर तोडगा न निघाल्यास मेहेर बाबांच्या धुनी जवळ न्याय मिळण्यासाठी मुक सत्याग्रह करण्याचा निर्णय सदरच्या बैठकित घेण्यात आला.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन युनियनच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी युनियनचे अध्यक्ष सतीश पवार, लालबावटाचे जनरल सेक्रेटरी अॅड. कॉ. सुधीर टोकेकर,
उपाध्यक्ष संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, सुभाष शिंदे, सुनिल दळवी, राधाकिसन कांबळे, प्रभाताई पाचारणे, सुनिता जावळे, किशोर कांबळे, प्रविण भिंगारदिवे आदींसह कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबांच्या श्रध्देपोटी अनेक दिवसापासून कामगार सेवा देत आहे. मात्र या महागाईच्या काळात जगणे देखील अवघड झाले असताना पगारवाढची मागणी करण्यात आलेली आहे.
मागील करारात ट्रस्टने चार हजार दोनशेची पगारवाढ दिली होती. या करारात फक्त कामगार चार हजार पाचशे रुपये पगार वाढची मागणी करीत आहे.
ट्रस्टनी मनाचा मोठेपणा दाखवून पगारवाढ देण्याची मागणी सर्व कामगारांच्या वतीने करण्यात आली. लाल बावटाचे जिल्हा सेक्रेटरी अॅड.कॉ. सुधीर टोकेकर यांनी सर्व कराराची, डिमांड नोटिसा व मध्यस्थी बाबत माहिती दिली.
युनियनचे अध्यक्ष सतीश पवार यांनी वेतनवाढीची अवाजवी मागणी केली नसून, किमान कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा या पध्दतीने कामगारांना वेतनवाढ मिळाली पाहिजे.
ट्रस्टचा बॅलेन्सशीट चांगला असून कोट्यावधीची उलाढाल सुरु असताना कामागारांप्रती सहानुभूतीपुर्वक विचार करण्याची गरज असल्याची भूमिका मांडली.