संसदेत घोषणाबाजी, आक्षेपार्ह टीका टाळा, प्रशासनाने खासदारांना करून दिली नियमांची आठवण

Pragati
Published:
sansad

लोकसभा अध्यक्ष किंवा राज्यसभा सभापती यांच्या निर्णयावर सभागृहात किंवा संसदेबाहेर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे टीका करू नका. खासदारांनी सभागृहात वंदे मातरम, जय हिंद यांसह इतर घोषणा देऊ नये, अशा विविध नियमांची प्रशासनाकडून खासदारांना आठवण करून देण्यात आली. नियमांनुसार खासदार संसदेत पोस्टर घेऊन प्रदर्शन करू शकत नाहीत.

येत्या सोमवारपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. तत्पूर्वी राज्यसभा सचिवालयाने खासदारांसाठीच्या नियम पुस्तिकेतील काही भाग आपल्या बातमीपत्रात प्रकाशित करून संसदीय परंपरा आणि शिष्टाचाराकडे सदस्यांचे लक्ष वेधले.

सभागृहाची प्रतिष्ठा जपण्यासाठी खासदारांना जय हिंद, वंदे मातरम यांसह कोणतीही घोषणा देऊ नये. सभागृहात आधीच्या घडलेल्या घटनांवरून सभापती निर्णय देत असतात. त्यांच्यासमोर आधीचे एखादे उदाहरण नसेल तर सामान्य संसदीय परंपरांचे पालन केले जाते.

सभापतींनी दिलेल्या निर्णयांवर संसदेच्या आत किंवा बाहेर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे टीका करू नये, असे सांगण्यात आले आहे. खासदारांना संसदेत बोलताना आक्षेपार्ह, आपत्तीजनक, असंसदीय शब्दांचा वापर टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सभापतींनी खासदारांच्या भाषणातील एखाद्या शब्दावर आक्षेप घेतला तर संबंधिताने कोणताही वाद न घालता आपला शब्द मागे घ्यावा. प्रत्येक खासदाराने सभागृहात प्रवेश करताना किंवा बाहेर जाताना आणि आसनावर बसताना किंवा उठून जाताना पीठासीन अधिकाऱ्याला वाकून अभिवादन केले पाहिजे.

एखादा खासदार इतर सदस्यावर किंवा मंत्र्यावर टीका करत असेल तर उत्तर ऐकण्यासाठी सभागृहात उपस्थित राहणे अपेक्षित आहे. सभागृह मंत्री उत्तर देत असताना खासदाराने अनुपस्थित राहणे संसदीय शिष्टाचाराचे उल्लंघन असल्याचे नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. या व याप्रकारच्या अनेक नियमांची आठवण यानिमित्ताने करून देण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe