अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-इंजेक्शन तुटवडा, बेड उपलब्ध नाही, ऑक्सिजन मिळत नाही, अपुरी आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय सुविधांचा आभाव यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचे मृत्यू तांडव अद्यापही कायम आहे.
यातच हे तांडव विस्तृतपणे विखुरले जात असल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात तब्बल 125 रुग्णांचा अंत्यविधी अमरधाममध्ये पार पडल्याचे भयानक तथा विदारक दृश्य समोर आले आहे.
कोरोनाच्या मृत्यूने गेल्या दोन दिवसांत उच्चांक गाठला आहे. कोरोनामुळे मंगळवारी ६५, तर बुधवारी ६० जणांचा मृत्यू झाला असून, दोन दिवसांत येथील अमरधाम येथे १२५ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी दुपारनंतर जागा शिल्लक नव्हती.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी लागणारा ऑक्सिजन व रेमडेसिविर उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणेची धावपळ सुरू आहे.
असे असले तरी कोरोनाचे मागील आठवड्यात सुरू झालेले मृत्यू तांडव याही आठवड्यात सुरूच आहे. सोमवारी ५६, मंगळवारी ६५ तर बुधवारी ६० जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्युत दाहिनीत दिवसभरात २० जणांवर अंत्यसंस्कार होतात.
उर्वरित ४० जणांवर एकाचवेळी लाकडावर अंत्यविधी केले गेले. त्यामुळे अमरधाम येथे मृतदेह ठेवायला जागा शिल्लक नव्हती. जिथे जागा मिळेल, तिथे अंत्यविधी उरकण्याची वेळ व्यवस्थापनावर आली आहे.