अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाने घट्ट विळखा घातला आहे. यामुळे दरदिवशी आकडेवारी वाढतच आहे तर दुसरीकडे मृत्युदर देखील वाढू लागला आहे. यामुळे प्रशासन देखील चक्रावून गेले आहे.
यातच आता दरदिवशी मृत्यूचा आकडा वाढत असल्याने आता शहरातील अमरधाम मध्ये मोठा ताण पडला आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले असून, प्रशासकीय यंत्रणेवर ताण आला आहे. अशा कठीण परिस्थितीत ही कर्मचारी अंत्यविधी करण्याचे काम करत आहेत.
लाकडांवर अंत्यविधी करावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडते. दरम्यान जिल्हा रुग्णालयातून मृतदेह अमरधाम येथे आणण्यासाठी शववाहिका कमी पडतात. त्यामुळे अंत्यविधीस विलंब होतो.
आणखी एक शववाहिका उपलब्ध करून दिल्यास वेळेवर अंत्यविधी करणे शक्य होईल. यासंदर्भात आमदार जगताप यांनी महापालिकेचे उपायुक्त यशवंत डांगे यांना सूचना केल्या व आणखी एक शववाहिका तातडीने उपलब्ध करून देण्यास सांगितले.
कोरोनामुळे शुक्रवारी ६६ जणांचा मृत्यू झाला असून, येथील अमरधाममध्ये ६० जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी दुपारी अमरधाम येथे भेट देऊन गर्दी न करण्याचे आवाहन केले.
अमरधाम येथे दररोज ५५ ते ६० जणांवर अंत्यविधी केले जात आहेत. अंत्यविधीच्या वेळी नातेवाईक गर्दी करतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त होत आहे. विद्युत दाहिनी कमी पडत असल्याने लाकडांवर अंत्यविधी होत आहेत.
अंत्यविधीच्या वेळी नातेवाईकांनी गर्दी न करता कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी महापालिकेच्या वतीने करण्यात आले.