Maharashtra news : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बहुचर्चित अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून ही घोषणा केली. अयोध्या दौरा तूर्त स्थगित करण्यात आला असून रविवारी (२२ मे) पुण्यात होणाऱ्या सभेत यावर चर्चा करू, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
दौरा स्थगित करण्याचे कारण ठाकरे यांनी नमूद केलेले नाही. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. ठाकरे यांच्या पायाच्या जुन्या दुखण्याने उचल खाल्ली असल्याचे सांगण्यात येते.
दौरा स्थगितीची घोषणा करताना ठाकरे यांनी मात्र, त्याचे कारण दिलेले नाही. पुण्यात रविवारी होणाऱ्या गणेश कला क्रीडा मंचच्या सभागृहातील सभेत यावर ते बोलणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
ठाकरे यांच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधून विरोध सुरू झाला होता. तर काहींनी स्वागत केले होते. दुसरीकडे महाराष्ट्रातील भाजपच्या काही नेत्यांनीही या दौऱ्याला विरोध केला होता. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आधीच अयोध्येला जाऊन आले होते.
अयोध्या दौऱ्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्नही मनसेच्या विरोधी पक्षांकडून होत असल्याचे दिसून येत होते. या पार्श्वभूमीवर राज यांचा दौरा होणार की लांबणीवर पडणार याची उत्सुकता होता. अखेर त्यांनीच यासंबंधी घोषणा केली.