अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-कोरोना आजार वाढत असल्यामुळे शिर्डी शहरातील साई मंदिर बंद करण्यात आले, त्यानंतर साईप्रसाद भोजनालयही बंद करण्यात आले.
शिर्डी शहरात अनेक हॉटेलांमध्ये अनेक निराधार वयोवृद्ध, मुले माफक पगारावर काम करतात. हॉटेलमध्ये काम करायचे व जेवणासाठी भोजनालयात जायचे,
असा त्यांचा नित्यक्रम अनेक वर्षापासून सुरू होता; मात्र या दुसऱ्या कोरोनाच्या लाटेत अनेकांनी हॉटेल बंद केल्यामुळे या कामगारांच्या रोजगारांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे.
काही मालकांनी आता पगार देऊ शकत नाही; पण दोन वेळेचे जेवण देऊ शकतो, असे सांगितल्यामुळे आता या जेवणावरच गुजरान करावी लागणार आहे. कोणाची पत्नी वारली, तर कोणाचा घरधनी गेला.
काहींना सुना, मुले सांभाळत नाही. अशा अवस्थेतील अनेकांना आतापर्यंत शिर्डीने आश्रय दिला. त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय केली. अनेकांना शिर्डीतील हॉटेल मालकांनी काम दिले.
अनेकांना घरातील सदस्य म्हणून सांभाळले; मात्र वर्षभरापासून शिर्डीतील अर्थकारण अडचणीत आले. त्यामुळे हॉटेलचालकही अडचणीत आले. सुरुवातीला काही दिवस या हॉटेलमालकांनी खिशातून पैसे खर्च करून या कामगारांना सांभाळले.
परंतु आता तेही अडचणीत आले आहेत. अनेकांनी हॉटेल बंद केले आहेत. मात्र यातील काही हॉटेलमालकांनी आता पगार देऊ शकत नसल्याचे सांगितले आहे. मात्र या कामगारांना वाऱ्यावर न सोडता घरातील सदस्यांप्रमाणेच दोन वेळचे जेवन देऊ केले आहे.
जोपर्यंत बाजारपेठ पूर्ववत होत नाही, तोपर्यंत पगार देऊ शकत नाही, असे त्यांनी कामगारांना सांगून टाकले आहे. कोरोनाची परिस्थिती पाहिल्यावर आणि लॉकडाऊनचा विचार केल्यावर आता दोन वेळचे भोजन मिळते, यावरच अनेकांनी समाधान मानले आहे.