अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचार्यांना पदोन्नतीत आरक्षण मिळावे, ओबीसींच्या राजकीय आरक्षण कायम रहावे व महागाई कमी करण्यासह विविध मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मंगळवारी 13 जुलैला आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विश्रामगृह येथे जिल्हा पदाधिकार्यांची नियोजन बैठक पार पडली.
बसपाचे प्रदेश सचिव बाळासाहेब आवारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीप्रसंगी जिल्हा प्रभारी संजय डहाणे, सुनिल ओव्हळ, जिल्हाध्यक्ष राजू शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र साठे, सुनिल मगर, जिल्हा महासचिव मच्छिंद्र ढोकणे, जिल्हा कोषाध्यक्ष अॅड. बाळकृष्ण काकडे, जिल्हा सचिव बाळासाहेब मधे,
शहर जिल्हाध्यक्ष संतोष जाधव, जाकिर शहा, माधव त्रिभुवन, सरपंच धनंजय दिंडोरे, बाबासाहेब वीटकर उपस्थित होते. बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांच्या निर्देशानुसार सपुर्ण महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालयावर 13 जुलैला मोर्चा व धरणे आंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे.
या मोर्चाच्या नियोजनासाठी सदर बैठक पार पडली. बैठकीच्या प्रारंभी कोरोना काळात मृत्यू झालेल्या पक्षातील पदाधिकारी, चळवळीतील कार्यकर्त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. उपस्थित जिल्हा पदाधिकार्यांनी प्रदेश सचिव बाळासाहेब आवारे यांचे स्वागत करुन सत्कार केला.
जिल्हा प्रभारी सुनिल ओव्हळ यांनी मोर्चाच्या अनुशंगाने माहिती देऊन कोरोना नियमांचे पालन करण्याचे पदाधिकार्यांना आवाहन केले. प्रदेश सचिव बाळासाहेब आवारे म्हणाले की, राज्य सरकार अनुसूचित जनजाती आणि इतर मागासवर्गीयांच्या हित संवर्धन विरुद्ध काम करीत आहे.
अनुसूचित जाती-जमातीच्या पदोन्नती संदर्भात राज्य सरकारने घेतलेली भूमिका या समाजा विरोधात केलेले कृत्य आहे. केंद्र सरकारने देखील इंधन दरवाढ करुन मोठ्या प्रमाणात महागाई वाढवली आहे. बहुजन समाजाला जागे होवून सरकारला जाब विचारण्याची वेळ आहे. बहुजन समाजाला भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
जिल्हा प्रभारी संजय डहाणे यांनी बहुजन समाजाचा फक्त मतांसाठीच वापर केला जात असून, स्वत:चे असतित्व टिकवण्यासाठी लढण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाध्यक्ष राजू शिंदे यांनी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून सर्व समाजाला जोडण्याचे काम करण्यात आले आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठविण्याचे व वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मंगळवार दि.13 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पुष्पहार अर्पण करुन मोर्चाची सुरुवात करण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
माळीवाडा येथील महात्मा फुले पुतळा व मार्केटयार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चा बंगालचौकी मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करुन मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. कोरोना नियमांचे पालन करुन मोर्चा सहभागी होण्याचे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बैठकीत करण्यात आले.
अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचार्यांना पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवावे, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ओबीसींचे आरक्षण पुर्ववत करण्यात यावे, शेतकर्यांच्या मालाला हमीभाव द्यावा, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडर व खाद्य तेलाच्या किंमती कमी करावे,
वाढती महागाई कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्या, कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती गंभीर बनली असताना वीज बील माफ करावे, कोरोनाने मयत झालेल्या कुटुंबीयांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याची मागणी बसपाच्या वतीने करण्यात आली आहे.