1 कोटी 78 लाखाच्या बँक ऑफ महाराष्ट्राची फसवणूक प्रकरणी आरोपीस जामीन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या चितळे रोड आणि नेप्ती शाखेतील थकीत कर्ज प्रकरणी आरोपी प्रसाद बाळासाहेब गुंड यांच्या विरुद्ध तोफखाना आणि नगर तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये सत्र न्यायालयाने आरोपीस जामिनावर मुक्तता केली आहे.

आरोपी गुंड यांनी 2014 साली बँकेच्या नेप्ती शाखेतून 80 लाख आणि 2015 साली चितळे रोड शाखेतून 98 लाख असे एकूण 1 कोटी 78 लाख रुपये व्यवसायिकामी कर्जरूपाने घेतले.

परंतु सदर रकमेचा वापर नमूद कारणासाठी न करता स्वतःच्या फायद्याकामी केला. या कारणास्तव बँकेचे झोनल मॅनेजर यांनी सदर आरोपीविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे 2018 मध्ये दाखल केले होते.

सदर आरोपी तीन वर्षे फरार होता. त्यास पोलिसांनी नोएडा (उत्तर प्रदेश) येथे जाऊन अटक केली होती. सदर आरोपीने सत्र न्यायालयात उपरोक्त नमूद गुन्ह्यात जामीन मिळणे कामी अ‍ॅड. परिमल कि. फळे यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता.

सदर अर्जाबाबत अ‍ॅड. परिमल फळे यांनी युक्तिवाद केला. सदर युक्तीवाद सत्र न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपीस दोन्हीही गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सोडण्याचा आदेश दिला आहे. सदर जामीन अर्जाकामी अ‍ॅड. परिमल फळे यांना अ‍ॅड. सागर गायकवाड, अ‍ॅड. अभिनव पालवे आणि प्राजक्ता आचार्य यांनी सहाय्य केले.

अहमदनगर लाईव्ह 24