अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी नुकतेच यूपीएचे अध्यक्षपद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना द्यावे, अशा आशयाचे विधान केले होते.
यावरून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत राजकारणी आणि संपादक यांच्यात गल्लत करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. एका वृत्तवाहिनीशी बोलताना थोरात यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. यूपीएचे नेतृत्व सोनिया गांधीच करणार आहेत. काँग्रेस हा देशव्यापी पक्ष आहे.
कदाचित अडचणीच्या काळातून जात असेल, मात्र देशाचे नेतृत्व काँग्रेसकडे आहे आणि त्यांच्याकडेच राहणार आहे.
अवघड दिवस निघून जातील आणि पुन्हा काँग्रेसचे दिवस येतील. त्यामुळे अशी कल्पना मांडणे मला योग्य वाटत नसल्याचे थोरात यांनी या वेळी म्हटले आहे. जेव्हा आघाडीचे प्रमुख एकत्र येतो तेव्हा यावर साहजिक चर्चा होते. आघाडीचे नेतृत्व त्यांच्याकडे आहे.