Balasaheb Thorat News : आज 7 फेब्रुवारी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उर्फ आबा यांचा वाढदिवस. आज ते 70 वर्षाचे झालेत. आबा यांच्या 70 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. दरम्यान त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला संगमनेर शहरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सुंदर कार्यक्रमाला अनेकांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या धर्मपत्नी कांचन थोरात यांनी म्हणजे जीजींनी भाषण केले. यावेळी कांचनजीजींनी आपल्या भाषणातून तुफान फटकेबाजी केली. यामुळे त्यांच्या भाषणाची संपूर्ण सोहळ्यात विशेष चर्चा पाहायला मिळाली. कांचनजीजी राजकारणात सक्रिय नाहीयेत. शिवाय त्या प्रसारमाध्यमांपासूनही लांब राहतात.
जेव्हा कौटुंबिक कार्यक्रम असतो तेव्हाच कांचनजीजी कार्यक्रमाला हजेरी लावतात. सक्रिय राजकारणापासून लांब असलेल्या कांचन थोरात यांनी मात्र आबांच्या वाढदिवसानिमित्ताने जोरदार भाषण दिले आहे. यामुळे सध्या सोशल मीडियामध्ये या भाषणाची चर्चा आहे.
सोहळ्याला उपस्थित असलेल्या अनेकांनी कांचनजीजींच्या मनमोकळ्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. जीजींच्या भाषणामुळे खऱ्या अर्थाने सोहळ्याला रंगत आली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कांचनजीजी भाषण करत होत्या आणि उपस्थित लोकांकडून सारख्या टाळ्या वाजवल्या जात होत्या. आबांनी देखील गालातल्या गालात हसून कांचनजीजींच्या भाषणाला दाद दिली आहे. यामुळे माजी महसूलमंत्र्यांचा हा वाढदिवसाचा सोहळा खूपच सुंदर झाला होता.
साहेबांचे पाय पाहूनच पसंत केले
यावेळी कांचनजीजी यांनी आबा जेव्हा त्यांना पाहायला गेले होते तेव्हाच्या आठवणींना उजाळा दिला. कांचन जीजी यांनी म्हटले की, “साहेब आता 70 वर्षांचे होताय. मी त्यांच्या पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. साहेब जेव्हा मला पाहायला आले तेव्हा मी त्यांचे पाय पाहूनच त्यांना पसंत केले. त्यांनी माझा चेहरा पाहिला असेल मात्र मी फक्त पायच पाहू शकले. आमचा योगायोग होता म्हणून लग्न जमलं.”
साहेबांचे पाय पाहूनच मी त्यांना पसंत केले असे जीजी बोलल्यात आणि सर्वांनी याला दाद दिली, जोरदार टाळ्या वाजवल्यात. पुढे बोलतांना जीजी यांनी आबा यांच्याबद्दल तक्रारही केली. जीजी म्हटल्यात की, “लग्नानंतर साहेबांनी 20 वर्ष कधी पिक्चर आणि नाटकाला सुद्धा नेल नाही. रोज फक्त पावणे-रावळे हेच करत आले. साहेबांनी मला अमेरिका, दुबई खूप फिरवलं. मात्र ते 30 वर्षानंतर. साहेबांना वेळच नव्हता, रोज राजकारण.
घरात आले की चेहरा पडलेला दिसायचा. मात्र कार्यकर्ते आले की लगेच जायचे आणि दीड दोन तास बोलत बसायचे. फक्त आपल्या समोर आले की मी थकलोय, झोप येते हे सुरू व्हायचं. मी जे बोलतेय ते मनातलं. पाठांतर केलेले नाही. मला कुटुंबाने खूप साथ दिली. नंतर मी मैत्रिणीचा ग्रुप बनवला. त्यांनी खूप साथ दिली. त्यामुळे आता काय मलाही साहेबांची आठवण येत नाही.”
कांचन जीजींनी अशा तऱ्हेने आपल्या भाषणाची सांगता केली. दरम्यान भाषण संपल्यानंतर उपस्थित मंडळीने जोरदार टाळ्या वाजवून कांचनजीजींच्या भाषणाला दाद दिली. आपल्या भाषणात कांचनजीजी यांनी जोरदार फटकेबाजी करत आबांची विकेट घेतली.
राजकारणात आबा यांनी अनेकांच्या विकेट घेतल्या असतील मात्र कांचनजीजी यांच्या भाषणापुढे ते क्लीन बोल्ड झालेत. विशेष म्हणजे कांचनजीजी यांचे भाषण झाल्यानंतर आबांनी देखील भाषण केले. यावेळी त्यांनीही त्यांच्या सुंदर संसाराच्या प्रवासातील काही आठवणींना उजाळा दिला.
आबांनी दिला आठवणींना उजाळा
बाळासाहेब थोरात यांनी जीजी यांच्या भाषणानंतर भाषणाला सुरुवात केली. त्यांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी त्यांच्या लग्नाचा किस्सा सांगितला. ते म्हटलेत की, त्यांचे वडील आमदार असताना त्यांनी वकिली पूर्ण केली. वकील झाल्यानंतर त्यांचा लग्नाचा विषय ऐरणीवर आला. मात्र त्यावेळी आबांचा त्यांच्याकडे रोजच पाहुणे आणि कार्यकर्त्यांची गर्दी होत असल्याने येथे टिकणार कोण?
हा मोठा प्रश्न होता. पण आबा जेव्हा कांचनजीजी यांना पहिल्यांदा पाहायला गेलेत तेव्हा त्यांचे माहेरचे प्रशस्त घर आणि मोठं कुटुंब पाहून कांचन जीजी घराची जबाबदारी बरोबर पार पाडतील अस आबांना वाटलं. आणि आज ते सार अचूक ठरलं असल्याची कबुली आबांनी दिली. दरम्यान आबा यांच्या भाषणानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजून त्यांना दाद दिली. एकंदरीत कांचनजीजी यांच्या तुफान फटकेबाजीनंतर आबा यांनी आठवणींना उजाळा दिल्याने हा सोहळा खूपच खास ठरला.