सर्जा-राजाला फाटा देत बळीराजाची आधुनिक शेतीकडे वाटचाल सुरु

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- राहुरी तालुक्याच्या पूर्वभागातील अनेक गावांमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे या भागात शेतकरीराजाने ट्रॅक्टरच्या साह्याने सोयाबीनची पेरणी सुरु केली आहे.

यामध्ये सोयाबीन, मका, कपाशी, या खरीप हंगामातील पिकांची पेरणी सुरू झाली आहे. यापूर्वी शेतकरी राजा सर्जा-राजा, हाऊशा नवश्या असे मोठमोठ्याने ओरडून बैलाच्या पाठीमागे पेरणी करीत होते.

मात्र, आता यंत्रयुगात सर्जा-राजाचा विसरच पडला आहे. आता शेतीसाठी शेतकऱ्यांची आधुनिकतेला पसंती दिली जात असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे.

यांत्रिकयुगात आधुनिक साधने व सुविधा निघाल्यामुळे शेतकरी ट्रॅक्टरने पेरणी करू लागला आहे. यामुळे प्रत्येक शेतकरी राजा छोटे-मोठे ट्रॅक्टर घेऊन आपली शेती करीत आहे.

आता सध्या डिझेलचे भाव वाढल्यामुळे एकरी पेरणीचे भाव बाराशे ते पंधराशे झाल्याने मशागतीचे दरही वाढले आहेत.

दरम्यान, पेरण्याच्या वेळेत रोहिणी आणि मृग नक्षत्राचा पाऊस झाल्यामुळे बळीराजा आनंदी असून आपापल्या शेतात पेरणी करण्यास सज्ज झाला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24