अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- जिल्ह्यात अनेक ठिकाणी काही दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा पाठ फिरवली आहे.
पाऊस नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. आणखी चार ते पाच दिवस पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. जोरदार पाऊस पडलेला नसतानाही अन्य शेतकऱ्याने पावसाच्या आशेवर पेरणी केली.
महागडे बियाणे शेतात टाकले त्यानंतर पावसाने ओढ दिली. गेल्या आठ दिवसांपासून फक्त ढगाळ वातावरण आहे. पाऊस गायब झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. ऐन जोमात असणारी पिके पावसाअभावी करपू लागली आहेत.
गेल्या १५ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या रकमेचे बियाणे खरेदी करावी लागले.
त्यातच पाऊस लांबणीवर गेल्याने पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. लवकर पेरणी साधण्यासाठी पाऊस येईल याआशेवर उपलब्ध असलेल्या ओलाव्यावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. ती पेरणी आता संकटात सापडली आहे.
पाऊस नसल्यामुळे बियाणे उगवण्यास अडचण निर्माण होत आहे. पाऊस नसल्यामुळे उगवलेले पीक किटक कृमी खात आहेत. त्यामुळे उगलेल्या पिकात तुटा पडत आहे. या तुटा लावण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची गरज आहे.