अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- शेतकऱ्यांवरील संकट काही थांबत नसल्याचं चित्र आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. यातच पुन्हा एकदा आस्मानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
नगर तालुक्यात गाराच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. निंबोडी, सारोळा बद्दी परिसरात गारांसह पाऊण तास जोरदार पाऊस झाला. तसेच जिल्ह्यात आज पाथर्डी, नगर तालुक्यात विविध ठिकाणी आज दुपारी गारांचा पाऊस पडला.
त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव, साकेगाव , चितळी, सांगवी, खेर्डै परिसरात दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गाराचा अवकाळी पाऊस झाला.
यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे कांदा, संत्रा, गहू, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे तसेच पाथर्डी तालुक्यातील डांगेवाडी शिवारात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.
डांगेवाडी येथून तीन किलोमीटर परिसरात जोरदार गारपीट होऊन सर्वत्र पाणीच पाणी झाले. सुमारे पंधरा मिनिटे गारपीट चालू होती.
गारपिटीमुळे डांगेवाडी येथील उसाचे व कांद्याचे मोठे नुकसान झाले. अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाले. नुकसानीची भरपाई मिळावी अशी शेतकऱ्याकडून मागणी होत आहे. पाथर्डी शहरात सुद्धा जोरदार वारे वाहत होते. साकेगाव परिसरात गारांचा पाऊस झाला.
दरम्यान हवामानातील बदलामुळे विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 18-21 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, असं हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दोन दिवसांपूर्वी ट्वीट केलं आहे