अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- जनधन योजना, संजय गांधी निराधार योजना लाभार्थीचे पैसे वाटप करणे, खात्यातून पैसे देणे, जमा करणे यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत बँक मित्र म्हणून नेमणूक केलेल्या बँक मित्राने ग्राहकांनी बँक खात्यात जमा करण्यासाठी दिलेले पैसे जमा केलेच नाही.
तसेच काहींच्या खात्यातून परस्पर पैसे काढणे, चेक आल्यावर रक्कम स्वत:च्या खात्यावर ट्रान्सफर करणे अशा प्रकारे अनेकांच्या खात्यांतून पैसे काढून लाखो रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार पारनेर तालुक्यात उघडकीस आला आहे.
याबाबत सविस्तर असे की राष्ट्रीयकृत बँकेत जनधन योजना, संजय गांधी निराधार योजना लाभार्थीचे पैसे वाटप करणे, खात्यातून पैसे देणे, जमा करणे यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत बँक मित्र म्हणून नेमणूक केलेली असते.
जेणेकरून नागरिकांना वेळेतच सुविधा उपलब्ध होतील. पारनेर तालुक्यातील त्या बँकेत देखील एकाची बँक मित्र म्हणून नेमणूक केली आहे.मात्र त्याने थेट बँकेसह खातेदारांनादेखील चुना लावला आहे.
बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ऑनलाईन बँकींगमधील पासवर्डचा वापर करून पारनेर तालुक्यातील त्या बँक मित्राने ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे काढून लाखो रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. यामुळे या भागात चांगलीच खळबळ उडाली आहे.