अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- पारनेर तालुक्यातील शहाजापूर येथील कवड्या डोंगरावर असणाऱ्या माऊली कृपा गोशाळा परिसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्याचा वावर असल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
येथील कर्मचाऱ्यांना दोन वेळा बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांसह परिसरातील नागरिकांनाही धोका निर्माण झाला आहे.
तालुक्यातील श्री क्षेत्र कौडेश्वर येथील डोंगरावर हभप नितीन महाराज शिंदे यांनी स्वखर्चाने स्वत:च्या जागेत माउली कृपा गोशाळा स्थापन केली आहे.
दरम्यान ही गो शाळा सुरू ठेवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करत दानशूर व गोभक्तांच्या मदतीतून त्यांनी ती यशस्वीपणे चालवली आहे.
कसायाच्या तावडीतून सुटका केलेल्या अनेक जनावरांना या गोशाळेमुळे जीवदान मिळालेले आहे. या गोशाळेत सद्यस्थितीत ५०० गोवंशाचे जतन व संवर्धन केले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने थेट गोशाळेच्या गेटजवळ हजेरी लावल्याने तेथील कर्मचारी भयभीत झाले आहेत.
कारण ही गोशाळा उंच डोंगरावर जंगलात असल्याने मदतीसाठी जवळ पास एकही वस्ती नाही. त्यामुळे जर बिबट्याने काही केले तर या भीतीने येथील कर्मचाऱ्यांत दहशत निर्माण केली आहे.
यापूर्वीही दोन बिबटे या परिसरात वावरत असल्याचे निदर्शनास आल्याने वनविभागाने याची तातडीने दखल घेऊन या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.