अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-एकीकडे मागील काही दिवसांपासून गायब झालेला कोरोना परत सक्रिय झाला असून दुसरीकडे परत त्यात आणखी भर पडली आहे ती म्हणजे बिबट्याची.
पाथर्डी तालुक्यातील मढी येथील डोंगररांगेत बिबट्याने पुन्हा दर्शन दिल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे.
बिबट्या मढी परीसरात आला होता. मात्र तो मच्छद्रिंनाथ गडाकडे गेल्याचे ठसे मिळाले आहेत. वनविभागाने मढी,
शिरापुर व घाटशिरस या भागातील नागरिकांना याबाबत सतर्क केले असून या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्याचे काम वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.
मागील काही महिन्यांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील मढी, शिरापुर व केळवंडी येथईल तिन बालकांचे प्राण घेणाऱ्या त्या बिबट्याच्या आठवणी ताज्या असतानाच आता परत मढी येथील साळवे वस्तीशेजारी बुधवारी सायंकाळी विजय साळवे यांनी बिबट्याला पाहीले.
यापूर्वीही बिबट्याने साळवे वस्तीवर हल्ला करुन मुलीचे प्राण घेतलेला आहे. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असता त्यांनी साळवे वस्तीवर जाऊन पाहणी केली.
त्यांना तेथे बिबट्याचे ठसे आढळुन आले व तो डोंगराच्या दिशेने वरती गेल्याच्या पाऊल खुणा दिसल्या आहेत. वनविभागाने या भागात पिंजरे लावले आहेत.
मढी, शिरापुर व घाटशिरस या भागातील नागरिकांना याबाबत कल्पना दिली असून, रात्रीच्या वेळी बाहेर पडु नका असे आवाहन देखील करण्यात आले आहे.