नगरकरानो वेळीच व्हा सावधान ! सेक्सटॉर्शन च्या माध्यमातून पैसे उकळण्याचा नवीन प्रकार समोर …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-  आता सायबर टोळ्यांनी सेक्सटॉर्शन च्या माध्यमातून पैसे उकळण्याचा नवीन प्रकार सुरू केला आहे. मागील काही दिवसात नगर जिल्ह्यात अनेक जण या नवीन प्रकाराचे बळी ठरले आहेत.

गेल्या दोन महिन्यात नगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तब्बल तीस जणांनी संपर्क करून त्यांच्या सोबत घडलेला हा प्रकार सांगितला आहे तर त्यापैकी वीस जणांनी तक्रार दाखल केली आहे याचा अर्थ प्रत्येक दोन दिवसाला एक जण या प्रकाराचा बळी ठरत आहे.

फेसबुक सोबत मेसेजिंग ॲप, डेटिंग ॲप आणि काही अश्लील वेबसाईट या ठिकाणी गुन्हेगार बनावट खाते बनवून पीडित व्यक्तीच्या संपर्कात येतात. खातेधारक व्यक्ती हा हाय प्रोफाईल व्यक्ती आहे आणि विशेष सुंदर अशी तरुणी आहे असे प्रथम भासवले जाते. पीडित व्यक्ती सोबत चॅटिंग करून मैत्री देखील केली जाते, त्यानंतर प्रेमाच्या गप्पा करून अश्लील बोलवण्यात हळूहळू गुंतवले जाते आणि हळूहळू सावज आपण सांगेल ते करणार इथपर्यंत आणून सोडले जाते.

त्यानंतर एखाद्या दिवशी वेळा समोरील व्यक्तीकडून पीडित व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून एकांतात जाण्यास सांगितले जाते आणि त्यावेळी त्याला नग्न होण्यास सांगत अश्लील हावभाव करण्यास भाग पाडले जाते आणि स्क्रीन रेकॉर्डिंग च्या माध्यमातून समोरील व्यक्ती त्याचा व्हिडिओ बनवतो. त्यानंतर पीडित व्यक्तीला त्याचा हा व्हिडिओ किंवा छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात येते आणि पैशाची मागणी केली जाते.

पाच हजारापासून 50 हजार रुपयांपर्यंत रक्कम मागितली जाते बदलांनी बदनामीच्या भीतीने अनेक जण अशा सायबर गुन्हेगारांना पैसे पाठवतात तर काहीजण रीतसर तक्रार देखील दाखल करतात. सायबर गुन्हेगार पीडित व्यक्तीला जाळ्यात ओढण्याआधी फेसबुकवर त्याची प्रोफाइल पाहतात. सदर व्यक्ती डॉक्टर इंजिनिअर शिक्षक वकील किंवा उच्चपदस्थ नोकरी करणारी असेल तरच त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते.

त्यानंतर हळूहळू त्यांच्या संपर्कात येऊन मैत्रीचे नाटक केले जाते. मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली जाते आणि त्यानंतर हा खेळ सुरू होतो. नगर शहरासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेले अनेक जण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकलेले असून काहींनी भीतीपोटी पैसे देखील दिले असल्याची बाब समोर आली आहे. आपण बळीचा बकरा करू नये यासाठी, ‘ सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये तसेच आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये.

व्हिडिओ कॉलवर समोरील व्यक्ती सांगेल तसे कुठलेही कृत्य करू नये. आपल्या फोन मध्ये खाजगी अर्धनग्न फोटो किंवा व्हिडिओ सेव्ह करून ठेवू नये आणि अशा संदर्भात एखादी घटना घडली तर कोणालाही पैसे देऊ नये त्याऐवजी सायबर पोलिसांशी संपर्क करावा’, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24