अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-बसचालकाला मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चौघांना न्यायालयाने दोषी धरून एक वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी 500 रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, 23 मार्च 2013 रोजी रात्री बबन राजाराम बुधवंत हे त्यांच्या ताब्यातील बस नगरहून सोलापूरकडे घेऊन जात असताना कारमधून आलेल्या चौघांनी त्यांना बस थांबविण्यास सांगितली.
रात्रीची वेळ असल्याने बुधवंत यांनी बस थांबविली नाही. पुढे आर्धा किलोमीटर बस गेल्यानंतर कार चालकाने बुधवंत यांच्या बसला कार आडवी लावली.
‘तुझी बस आमच्या कारला घासली आहे’, असे म्हणत कारमधील शरद अशोक भोर, संदीप तान्हाजी लांडगे (दोघे रा. केडगाव),
दादा गोरख पवार, पोपट भाऊसाहेब भोगाडे (दोघे रा. साकत ता. आष्टी जि. बीड) या चौघांनी बुधवंत यांना मारहाण केली.
बुधवंत यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान न्यायालयाने या चौघांना दोषी धरून एक वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी 500 रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.