अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- मागासवर्गीय कुटुंबीयांना सार्वजनिक पाणवठा बंद करून, जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करणार्यांवर अॅट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी खडांबे (ता. राहुरी) येथील पिडीत साळवे कुटुंबीय व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने करण्यात आली.
सदर प्रकरणी आरोपींना पाठिशी घालून कर्तव्यात कसूर करणार्या राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देऊन पिडीत कुटुंबीयांनी निवसी उपजिल्हाधिकारी संदिप निचीत यांची भेट घेऊन दोन अपंग,
मुकबधीर मुलींसह सर्व कुटुंबातील सदस्यांना मारहाण झाली असून, आरोपींकडून जिवीतास धोका निर्माण झाल्याची व्यथा मांडली. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक शहर जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, आजिम खान, जावेद सय्यद, संतोष पाडळे,
नईम शेख, पिडीत कुटुंबीय विमल साळवे, कुसूम साळवे, मनिषा साळवे, सुषमा साळवे, सोनाली साळवे, अंतवन साळवे आदी उपस्थित होते. राहुरी तालुक्यातील खडांबे येथे साळवे कुटुंबीय राहत आहे. साळवे वस्ती जवळच सार्वजनिक पाणवठा असून, तो शासनामार्फत बांधण्यात आला आहे.
त्याचा उपभोग लटके कुटुंबीय घेत आहे. पाण्याची अडचण असताना साळवे कुटुंबीयांचे सदस्य पाणवठ्यावर गेले असता, लटके कुटुंबीयांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करुन दमबाजी केली. सदर प्रकरणी साळवे कुटुंबीयांनी राहुरी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याचा राग येऊन त्यांना लटके कुटुंबीयांनी शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.
सदर प्रकार जातीय द्वेषातून होत असल्याचे सांगण्यात येऊन देखील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी या प्रकरणी दि.26 मे रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. हे प्रकरण पोलीसांनी गंभीर घेतले असते तर साळवे कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला झाला नसता.
तक्रार दिल्याचा राग धरून साळवे कुटुंबीयांना धारेवर धरण्यास सुरुवात करण्यात आली. एकमेकांची शेती लागूनच असल्याने लटके यांनी बांधावरून भांडणे सुरु केली. साळवे यांच्या शेतातील सात ते आठ झाड मुद्दामून तोडून जाळण्यात आले.
याबाबत साळवे यांनी दि.14 मे रोजी वन विभाग राहुरी येथे लेखी तक्रार दिली. परंतु त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. लटके कुटुंबीयांना राग अनावर झाला असता त्यांनी विमल साळवे यांच्या घरावर प्राणघातक हल्ला केला.
यामध्ये त्यांनी महिलांशी गैरवर्तन करुन पुरुषांसह दोन अपंग व मुकबधीर मुलींसह सर्वांना बेदम मारहाण केली. यानंतर विमल साळवे यांच्या फिर्यादीवरून अर्जुन लटके, अनिल लटके, प्रतीक अर्जुन, संदीप लटके आणि अनिल लटके यांचा मोठा मुलगा व अर्जुन लटके यांची पत्नी यांच्यावर दि.7 जून रोजी राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
जातीयद्वेषातून हा प्रकार घडला असताना संबंधीत आरोपींवर अॅट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सदर घटना मानवतेला काळीमा फासणारी असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. साळवे कुटुंबीयांना जीतीय द्वेषातून त्रास देण्यात आला.
या प्रकरणात पोलीसांनी योग्य भूमिका घेतली असती तर साळवे कुटुंबीयांवर हल्ला झाला नसता. पोलीसांनी आरोपींना अभय दिल्याने हा प्रकार घडला आहे. आरोपींकडून मागासवर्गीय व दुर्बल घटक असलेल्या साळवे कुटुंबीयांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन मागासवर्गीय साळवे कुटुंबीयांवर अन्याय-अत्याचार झाला असताना पोलिसांनी तातडीने आरोपींवर अॅट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा, आरोपींना पाठीशी घातल्याप्रकरणी राहुरीचे पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे.