अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- अहमदनगर -यंदाचे शैक्षणिक वर्ष म्हणजेच 2021-2022 च्या शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सुटीसाठी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप थेट न करता विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे.
यामुळे या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे नवीन बँक खाते उघडण्यात यावे. बँक खाते आधार लिंक करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे पालकांना आपल्या पाल्याच्या अनुदानाच्या रक्कमेसाठी तातडीने त्यांची बँक खाती खोलावी लागणार आहे.
दरम्यान सरकारच्या या निर्णयामुळे देशात सरकारी आणि अनुदानित शाळांमधील 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
त्यानुसार अनेक शाळांनी याची अंमलबजावणी सुरू केली असून वर्गशक्षक आपापल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून खाते उघडण्याचे आवाहन करीत आहेत.
राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, जिल्हा परिषद हायस्कूल, अनुदानित, अंशतः अनुदानित सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.
ऐन लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याचे आदेश सर्व शाळांना दिल्याने शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागणार असल्याच्या तक्रारी आहेत. दुसरीकडे शासन करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रयत्न करताना दिसून येत आहे.
मात्र या काळात विद्यार्थ्यांची बँक खाते उघडण्याचे आदेश सर्व शाळांना दिल्याने बँकांमध्ये गर्दी होऊन करोना संसर्ग वाढण्याची भीती पालकवर्गांकडून व्यक्त होत आहे.