अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- पंधरा दिवसांत नेवासे तालुक्यात सुमारे २५०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत, तरी नेवासे तालुक्यातील रुग्णालयांचे व कोविड सेंटरचे ७० टक्के बेड मोठ्या संख्येने रिकामे आहेत.
त्याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. मागील महिन्यात एप्रिलमध्ये नेवासे तालुक्यात रुग्ण वाढीचा वेग अत्यंत कमी होता. त्यातील दहा ते बारा दिवस टेस्ट किटच उपलब्ध नसल्याने कोरोना चाचण्या होत नव्हत्या.
६ मेपासून मात्र तपासणी किट उपलब्ध झाल्यानंतर तालुक्यामध्ये ९ प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयासह गावोगाव तपासण्या होत आहेत.
परिणामी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. ९ मे पासून नेवासे तालुक्यातील रुग्णांची संख्या रोज १०० पेक्षा जास्त येऊ लागली १०, १९ व २० मे रोजी अनुक्रमे ३०० ते ४०० रुग्ण आढळून आले. नेवासे तालुक्यामध्ये कोअर सेंटरसह १७ कोविड रुग्णालय आहेत.
या कोविड सेंटरमध्ये एकूण ११८० बेड आहेत. सध्या त्यापैकी ७१० बेड रिकामे आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेपुढे हे दोन आठवड्यात निष्पन्न झालेले नवीन सुमारे २५०० कोरोना बाधित रुग्ण कुठे गेले, असा प्रश्न उभा आहे.
नेवासे तालुक्यात सर्व ठिकाणी मिळून ९२१ पैकी ६०७ नॉर्मल बेड, २१७ ऑक्सिजन बेड आहेत. यापैकी ८२ व ३८ आयसीयूपैकी १९ बेड रिकामे आहेत. तालुक्यामध्ये केवळ पाच व्हेंटिलेटर आहेत. त्यापैकी तीन रुग्ण ॲडमिट आहेत. प्रभावीपणे हिवरे बाजार पॅटर्नप्रमाणे काम करणे गरजेचे आहे.