अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :-जमीन मालकाऐवजी सातबारावर दुसर्या व्यक्तीचे नांव लावण्याच्या प्रकरणात महसूल विभागाचे अधिकारी सामील असल्याचा आरोप करुन, पारनेर तालुक्यातील पोखरी, कातळवेढा, डोंगरवाडी महसूल विभागातील अधिकार्यांच्या गलथान कारभाराची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. पोखरी (ता. पारनेर) येथे काही दिवसांपूर्वी तक्रारदारांनी सदर प्रकरणी उपोषण केले होते. याची दखल घेऊन पारनेर तहसीलदार यांनी शिबिर घेऊन तक्रारदारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
परंतु काही तक्रारदार यांच्या कागदपत्राच्या फेरफारमध्ये महसूल विभागाचे अधिकारी सामील असल्याने तक्रारदारांना अजून न्याय मिळाला नाही. याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
गट क्रमांक 435/2 माणिकलाल मोतीलाल गांधी यांचे खरेदीखत होऊनही अधिकार्यांनी पदाचा गैरवापर करून सातबारावर नावे दुसर्यांची लावली आहे. गट क्रमांक 432/8 भोगवाटा क्रमांक दोनची जमीन तुळशीराम लामखडे यांच्या मालकीची असून,
ही जमीन विक्री होऊन दुसर्याची नांवे लावण्यात आली आहे.महसूल कायद्यानुसार भोगवाटादार यांना भूमिहीन करता येत नाही. गट क्रमांक 432/4 मध्ये महादू म्हतारबा शेलार यांचा या गटाशी कुठलाही संबंध नसताना 31 डिसेंबर 1982 रोजी त्यांची मयत झाली असून,
देखील त्यांच्यावर नावावर सदर जमीन दाखविण्यात आली आहे. लतीफ पटेल यांच्या ही जमिनीच्या कागदपत्रांत फेरफार करण्यात आला आहे. वरील सर्व प्रकरणात सामील असणारे कामगार तलाठी प्रांताधिकारी,
श्रीगोंदा, पारनेर पर्यंत सर्व अधिकर्यांची चौकशी सक्षम महसूल अधिकार्यां मार्फत करण्यात यावी, यामधे दोषी असलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.