अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्रात दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी शाळा, महाविद्यालय बंद असल्याने एक पिढी बर्बाद होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप करुन, पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने शैक्षणिक पालकशाही अभियानाची घोषणा करण्यात आली.
या अभियानातंर्गत शाळा, महाविद्यालये सुरु होण्यासाठी विद्येची देवता श्री विशाल गणपती मंदिरासमोर शनिवार दि.18 सप्टेंबर रोजी घंटानाद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अॅड. कारभारी गवळी यांनी दिली. अनेक शिक्षण तज्ञांनी महाराष्ट्रात शाळा बंद असल्याने लहान मुले व युवकांवर विपरीत परिणाम होऊन ते हिंसक व चुकीच्या पध्दतीने वागत असल्याचे अभ्यासाने निष्कर्ष काढले आहेत.
कोरोनाचा बागुलबुवा करुन अधिक काळ शाळा, महाविद्यालये बंद ठेवता येऊ शकत नाही. त्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. शैक्षणिक पालकशाही अभियानाद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांना पालकांनी सकाळ, संध्याकाळी उकडलेले अंडी, दुध देऊन दररोज योग, प्राणायामाचे धडे दिल्यास त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढणार आहे.
कोरोनाचा आकडा शुन्यावर आनण्यासाठी या पध्दतीने मुलांना सुदृढ बनविण्यासाठी पालकांना आवाहन केले जाणार असल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारने फक्त फतवे काढून शाळा, महाविद्यालये बंद ठेवणे चुकीचे आहे. कोरोनाशी लढा देताना शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे लसीकरण होऊन शाळा उघडण्याची वेळ आली आहे. अन्यथा एक पिढी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही.
याला कोरोना कारणीभूत नसणार तर सरकारची निष्क्रियता जबाबदार असणार असल्याचे अॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. ग्रामीण भागातील व शहरातील गरीब कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी स्मार्ट मोबाईल, लॅपटॉप व संगणक नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.
कोरोना काही दिवसात संपणारी गोष्ट नसून, त्यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता आहे. नियमाचे पालन करून शाळा, महाविद्यालय सुरू करण्याची मागणी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत व जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.
या आंदोलनास माजी कुलगुरू सर्जेराव निमसे यांनी देखील पाठिंबा दर्शविला आहे. या अभियानासाठी ऍड. गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, ज्ञानदेव काळे, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम आदी प्रयत्नशील आहेत.