अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे व खतांचा आवश्यक पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या याआदेशानुसार जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे.
खरीपाच्या पेरणी दरम्यान शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, बी-बियाणे व खतांची साठेबाजी व काळाबाजार होऊ नये. यासाठी कृषि विभागाने १५ भरारी पथके नियुक्त केली आहेत.
जर या भरारी पथकांना बी-बियाणे व खतांच्या बाबतीत गैरप्रकार आढळल्यास साठा जप्त करण्यासह त्या दुकानाचा परवाना रद्द करण्याबरोबरच फौजदारी गुन्हे देखील दाखल केले जातील.
असे कृषि उपसंचालक विलास नलगे यांनी सांगितले. मागील दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेत मग्न आहे. दरम्यानच्या काळात प्रशासनाने खरीप हंगामाचे देखील नियोजन केले आहे. पावसाळा तोंडावर आल्याने शेतकरी खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीची कामे करण्यात व्यस्त आहे.
पेरणीसाठी जिल्हा प्रशासन खरीपाच्या विविध वाणांचे बियाणे तसेच खते उपलब्ध करण्याचे नियोजन केले आहे.
यासंदर्भात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आढावा बैठक घेतली असून यात खरीप हंगामाच्या पेरणीदरम्याने खते व बियाणे यांची साठेबाजी,
काळाबाजार होण्याचे प्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा कृषी विभागाने खते व बियाणे विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी १५ पथके नियुक्त केली आहेत. जिल्हा कृषी अधिकारी सुनिलकुमार राठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय एक पथक स्थापन करण्यात आले आहे.