Fraud Loan Alert : सध्या डिजिटल युगात बँकांच्या नावाने अनेक बनावट पोर्टल आणि कर्ज देणारे अॅप्स आहेत. विशेष म्हणजे हे बनावट पोर्टल हुबेहुब तुमच्या बँकेच्या पोर्टलसारखेच दिसत असते. त्यामुळे कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी ते खऱंच तुमच्या बँकेचे पोर्टल आहे का याची खात्री करून घ्या.
जर तुम्ही ऑनलाईन कर्ज घेत असाल तर थोडी सावधगिरी बाळगा. कारण आता या डिजिटल युगात बँकिंगचे काम बोटांवरच होत आहे. एखादे बटण दाबताच क्षणी ऑनलाइन पेमेंट किंवा व्यवहार होत आहे. त्यामुळे असे गैरप्रकार टाळण्याचे कोणते मार्ग आहेत जाणून घ्या.
याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे
- केवायसी
हे लक्षात घ्या की आता केवायसीच्या नावाखाली फसवणूक होत आहे. हे लोक केवायसीच्या नावावर लोकांना बनावट बँक कर्मचारी म्हणून फोन करून किंवा बनावट लिंक द्वारे त्यांची गोपनीय माहिती चोरून त्यांचे बँक खाते रिकामी करतात. त्यामुळे नेहमी अशा लोकांपासून दूर राहा.
- आकर्षक ऑफर
इतकेच नाही तर फसवणूक करणारे लोकांना कर्ज देण्याच्या नावाखाली बनावट कॉल करून तुम्हाला आकर्षक ऑफर देतात, ज्यात लोक अडकतात आणि याचा फायदा घेऊन फसवणूक करणारे त्यांची गोपनीय माहिती काढून घेतात.
- बनावट लिंक्स
फसवणूक करणारे लोकांना त्यांच्या मोबाइलवर मेसेज, ईमेल आणि व्हॉट्सअॅप इत्यादीद्वारे कर्ज देण्याच्या नावाखाली बनावट लिंक पाठवतात. त्याशिवाय त्या लिंक्ससह एक संदेश लिहण्यात येतो ज्यात कर्ज घेतल्यावर प्रक्रिया शुल्क माफी किंवा प्रथम EMI माफी यांसारख्या गोष्टी लिहण्यात येतात. लोक याला बळी पडून त्या लिंक्सवर क्लिक करतात. त्यामुळे तुमची माहिती चोरीला जाऊन तुमचा मोबाईल किंवा सिस्टम हॅक होऊ शकतो.
- बनावट अॅप
बऱ्याचदा CIBIL स्कोर कमी असल्याने काही जणांना बँक किंवा NBFC कंपनी कर्ज देत नाही. परंतु, बाजारात असे अनेक प्रकारचे अॅप्स आहेत, जे लोकांना कर्ज देतात. सध्या अनेक बनावट अॅप्स असून जे आधी तुमच्याकडून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली पैसे घेऊन नंतर कर्ज देत नाहीत. त्यामुळे असे अॅप इन्स्टॉल करणे टाळा.