Bhandardara Dam Storage : भंडारदरा धरण किती भरले ? जाणून घ्या धरणातील पाणीसाठा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Bhandardara Dam Storage :- संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या भंडारदरा धरण भरण्याची प्रतिक्षा संपण्याच्या मार्गावर असून धरण पाणलोटात गत दोन दिवसांपासून सुरु असलेल्या श्रावणसरींमुळे भंडारदरा धरण ९९ टक्के भरल्यात जमा झाले आहे.

अकोले तालुक्यातील अति महत्वाचे समजले जाणारे भंडारदरा धरण यावर्षी कधी भरते शेतक-यांसह संपुर्ण नगर जिल्ह्याला पडलेला होता. गत दोन दिवसांपासून मात्र भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह परिसरात कमी- जादा प्रमाणात श्रावणसरी कोसळत आहे.

त्यामुळे नदी नाले वाहते झाले आहे. भंडारदरा धरणात पुन्हा पाण्याची आवक सुरु झाली आहे. त्यामुळे भंडारदरा धरणाच्या साठ्यात वाढ होऊन भंडारदरा धरण ९८.८२ टक्के भरले आहे. दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या अगोदर भंडारदरा धरण भरण्याचा विक्रम यावर्षी मात्र मोडीत निघाला आहे.

धरण भरण्यासाठी बरेच दिवस नागरीकांना प्रतिक्षा करावी लागली. आता मात्र धरण ९९ टक्क्यावर पोहचल्यामुळे ख-या अर्थाने भंडारदऱ्याला भरण्याचे वेध लागले आहेत. धरणाचा साठा ११,०३९ दलघफुट होताच भंडारदरा धरण भरल्याचे धरण शाखेकडून घोषित करण्यात येईल.

गत दहा ते बारा दिवसांपासून भंडारदरा पाणलोटात पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे आदिवासी बांधवांची भातशेतीही धोक्यात आली होती. मात्र या भातपिकांना पडत असलेल्या सौम्य स्वरुपाच्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

गत २४ तासामध्ये भंडारदरा येथे ३३ मीमी पावसाची नोंद झाली. घाटघर येथे ७३ मीमी पाऊस पडला. रतनवाडीला ६५ मीमी, पांजरे ४३ मीमी तर वाकी येथे १४ मीमी पावसाची नोंद झाली. वाकी लघुबंधारा पूर्ण क्षमतेने भरलेला असून ९८ क्युसेसने पाणी कृष्णावंती नदीमध्ये वाहत आहे.

११,०३९ दलघफुट क्षमता असलेल्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा संध्याकाळी सहा वाजता १०,९०९ दलघफुट झाला आहेब तर भंडारदरा धरण ९८.८२% भरले आहे. निळवंडे धरणही ८२% भरले असून शेवटची बातमी हाती आली तेव्हा धरणाचा पाणीसाठा ६,८४१ दलघफु झाला होता

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24