अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- कोरोनाकाळात जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. यातच आता दिवसाढवळ्या देखील चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भरदिवसा एका घराचे कुलूप तोडून सोने-चांदीच्या दागिन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील निंबोडीवाडी येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, बाळासाहेब शेटे हे निंबोडीवाडी येथे लगत रस्त्याच्या कडेला शेतजमिनीमध्ये वस्ती करून राहतात.
ते सकाळी ११ वाजता पत्नीसह शेतात कांदे भरण्याच्या कामासाठी गेले होते. ते दुपारी अडीचच्या सुमारास शेतातून परत आले असता त्यांना घराचे कुलूप तोडल्याचे लक्षात आले.
त्यांनी घरात प्रवेश करताच घराच्या साहित्याची उचकपाचक केल्याचे दिसले. कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरी झाल्याचे लक्षात आले.
त्यावरून त्यांनी ही घटना श्रीगोंदा पोलिसांना कळविली. पोलिसांनी तातडीने श्वानपथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.