अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-येथील एका कांदा व्यापाऱ्याने बँकेतून काढलेली अडीच लाखांची रक्कम एका रेक्झीनच्या पिशवीत ठेवली.
व ती पिशवी कारमध्ये ठेवून कार पार्कींगध्ये लावलेली असताना अज्ञात भामट्याने त्यांच्या कारची काच फोडून आत ठेवलेली अडीच लाखांची रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर असे की, शहरातील कांदा व्यापारी गणेश लक्ष्मणराव ताठे यांनी त्यांच्या व्यावसायाच्या काही कामानिमित्त शहरातील मार्केट यार्ड परिसरातील एका बँकेतुन अडीच लाख रूपयांची रोख रक्कम काढली.
ती रक्कम एका रेक्झीनच्या पिशवीत ठेवली. व ती पिशवी डस्टर या त्यांच्या मालकीच्या कारमध्ये पाठीमागील सीटवर ठेवली. त्यानंतर ते लाल टाकी परिसरातील सुदर्शन निवास येथे गेले तेथे त्यांनी ही गाडी पार्कींगमध्ये उभी करून काही कामानिमित्त गेले.
दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या भरदुपारी कारची काच फोडून आतील पिशवीत ठेवलेली अडीच लाखांची रक्कम पिशवीसह लंपास केली.
याबाबत गणेश ताठे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी अधिक तपास पोसई शेळके हे करत आहेत.