Maharashtra News:चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं आज मंगळवारी निधन झालं. मागील अनेक महिन्यापासून ते आजारी होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख होती.
जगताप यांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवड शहरात तसेच चिंचवड मतदार संघात शोककळा पसरली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करण्यापासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली होती. मनपाचे महापौरपदही त्यांनी भूषविले होते.
तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. गेल्या काही महिन्यांपासून लक्ष्मण जगताप हे कर्करोगाशी झुंज देत होते. त्यामुळे ते अंथरुणला खिळून होते. परिणामी लक्ष्मण जगताप हे राजकीय जीवनात सक्रिय नव्हते.
दुर्धर अशा आजारावर त्यांनी मात केली अस बोललं जातं होत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणादेखील होत होती. पण, दीपावलीनंतर त्यांना पुन्हा प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असताना त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपुष्टात आली,
अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली. जून महिन्यात झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी लक्ष्मण जगताप यांचे एक मत भाजपासाठी बहुमोल ठरले होते. आजारी असतानाही मुंबईला रुग्णवाहिकेतून येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने लक्ष्मणराव जगताप यांनी शेकापमध्ये प्रवेश केला होता. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर काही महिन्यांतच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपकडून उभे राहिले होते.
या निवडणुकीत लक्ष्मण जगताप विजयी होऊन विधानसभेत निवडून गेले होते. जून महिन्यात झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी लक्ष्मण जगताप यांचे एक मत भाजपासाठी बहुमोल ठरले होते. आजारी असतानाही मुंबईला रुग्णवाहिकेतून येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
जगताप यांचा राजकीय प्रवास
१९८६ साली पहिल्यांदा नगरसेवक
२००२ पर्यंत नगरसेवक, दरम्यान महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष
२००४ पासून आमदार
२०१४ साली भाजपमध्ये प्रवेश
२०१४ आणि २०१९ असे दोनवेळा भाजपचे आमदार
२०१७ साली महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन करण्यात मोलाचा वाटा
भाजपचे नेते आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील जगताप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. “पिंपरी-चिंचवडमधून तीन वेळा निवडून आलेले आमदार आणि माझे जवळचे सहकारी लक्ष्मण जगताप यांचं निधन खूपच धक्कादायक आहे. पक्षनिष्ठा आणि समर्पणाचा लक्ष्मणजी वस्तुपाठ होते. बरे होतील असं वाटतानाच त्यांचं असं जाणं चटका लावणारं आहे. आम्ही सगळे जगताप कुटुंबासोबत आहोत. श्रद्धांजली! ओम शांती!”, अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विट केली आहे