अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- मुंबईतील वांद्रे रेल्वे पोलिसांना निनावी फोनद्वारे मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. तशी माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हा फोन आल्यानंतर मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकांत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या निनावी फोन कॉलबाबत सध्या तपास सुरु करण्यात आलाय. या तपासानंतरच हा फेक कॉल होता का? याबाबत स्पष्टता येईल. मात्र, पोलिसांकडून मुंबईतील रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
‘मुंबईतील संभाव्य बॉम्ब हल्ल्याची माहिती आज वांद्रे आरपीएसकडून दूरध्वनीवरून प्राप्त झाली आहे. कॉलरशी संपर्क साधण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालीद यांनी दिली. तसंच, सध्याची परिस्थिती पाहता शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सर्व एजन्सींना कळविण्यात आले आहे.
आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. घाबरण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही, असंही खालीद यांनी स्पष्ट केलं. हितेश नावाचा एक व्यक्ती कांदिवली परिसरात राहत असून सध्या तो नोकरीनिमित्त दुबई येथे वास्तव्यास आहे. शनिवारी दुपारी त्याने दुबईहून वांद्रे रेल्वे पोलिसांच्या दूरध्वनी क्रमांक ०२२२२६४२२०४७ या क्रमांकावर कॉल केला.
त्याने स्वत:ची ओळख सांगून तसेच त्याची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर त्याने जावेद नावाचा एक व्यक्ती मुंबईत बॉम्बस्फोट घडविणार आहे. आगामी दिवसांत कधीही मुंबईत बॉम्बस्फोट होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी योग्य ती काळजी घ्यावी, तसेच त्याचे नाव गुपित ठेवावे अशी विनंती केली.
मुंबईत चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन यापूर्वी 7 ऑगस्ट रोजीही एका निनावी फोन कॉलद्वारे सीएसएमटी, दादर, भायखळा आणि बिग बींच्या बंगल्यावर बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाकडून तातडीने शोधमोहिम सुरु करण्यात आली होती.
सीएसएमटी स्टेशनवर प्रवाशांना कुठलाही त्रास न होऊ देता त्यावेळी शोधमोहीम सुरु करण्यात आली होती. महत्वाची बाब म्हणजे ज्या नंबरवरुन हा फोन कॉल आला होता त्याला परत फोन लावल्यावर माझ्याकडे असलेली माहिती तुम्हाला दिली आहे.
आता मला डिस्टर्ब करु नका, असं तो व्यक्ती म्हणाला. त्यानंतर त्याने आपला फोन बंद करुन ठेवला आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. शेवटी पोलीस तपासात हा फेक कॉल असल्याचं स्पष्ट झालं.